प्रताप नाईक,कोल्हापूर : कोल्हापूरातील एक शाळकरी मुलानं मोबाईलचा वापर करत डोअर कॉल सिक्युरिटी अलर्टची निर्मिती केली आहे. सध्या चोरट्यांकडून कधी, कुठे आणि कसा डल्ला मारला जाईल याचा नेम नाही. त्यामुळे आपलं घर, दुकान आणि कार्यालयाचे दरवाजे कितीही मजबूत केले तरी चोरटे शिरजोर ठरत असल्याचे पाहायला मिळतं. मात्र आता अशा चोरट्यांची काही खैर नाही. कारण या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शक्कल कोल्हापूरच्या रॅन्चोनं शोधून काढली आहे.
कोल्हापूरच्या नाळे वसाहतीत राहणाऱ्या सोळा वर्षीय सार्थक जाधवनं हे डोअर कॉल सिक्युरिटी अलर्ट हे उपकरण तयार केलं आहे. सार्थक हा कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलचा विद्यार्थी असून शाळेत असताना त्याने मेकानिकल ट्रेड घेतला होता. मात्र त्याला इलेक्ट्रॉनिकची आवड असल्याने मित्रांची पुस्तकं घेऊन नवनवीन प्रयोग करत होता. त्यातूनच त्याने हे उपकरण बनवलं आहे.
सार्थकच्या वडिलांचा मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. त्यामुळे भंगार झालेल्या मोबाईल तसंच इतर वस्तूंचा वापर करून सार्थक काही ना काही नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. चोरट्यांपासून संरक्षण करण्यासाठी सार्थकने बनवलेले उपकरण अत्यंत उपयुक्त करणार आहे. घराचा दरवाजा कुणी उघडला की लगेच घरमालकाच्या मोबाईलवर स्पीड डायलने फोन येतो. याची माहिती मोबाईलधारक मालकाला मिळते.
ही डोअर कॉल सिक्युरिटी अलर्ट यंत्रणा एकावेळी नऊ दरवाजांवर वापरता येते. यातील एकही दरवाजा उडघडला गेला तर त्याचा संदेश घरमालकाला मिळतो. त्यामुळे सार्थकचं हे संशोधन नक्कीच फायदेशीर ठरेल यांत शंका नाही.