Kolhapur Live News: महाराष्ट्रासह राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस बरसत आहे. कोल्हापुरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढल्याने प्रशासनाने इशारा दिला होता. मात्र आता कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोल्हापूरातील पूरसदृश्य परिस्थीती नियंत्रणात आली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे.
कोल्हापूरात निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळं कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उद्यापासून कोल्हापुरातल्या शाळा सुरू होणार आहेत. तसंच, पूराच्या धोक्यामुळं स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांना उद्या घरी जाण्याची परवानगीही देण्यात आली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. त्यानंतरच हे निर्णय घेण्यात आले आहे. तसंच, बालिंगा पुलावरुन एकेरी वाहतूक सरु ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पण असे असले तरी कोल्हापुरात पुराची स्थिती जैसे थे आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे पाणीपातळीत वाढ झालेली नाही. पंचगंगा नदीच्या पातळीत गेल्या 24 तासांत एक इंचही वाढ झालेली नाही. मात्र असं असलं तरी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे.
गेल्या 24 तासांपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर आहे. पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळं सतर्कता म्हणून नदीकाठच्या लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते. मात्र, आता पावसाचा जोर ओसरला आहे. पंचगंगाची पाणी पातळीही स्थिर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर नदीच्या पाणी पातळीत अजून घट होऊ शकते. त्यामुळं ज्या लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते त्यांना पुन्हा त्यांच्या गावी सोडण्यात येणार आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.