चंद्रपूर : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात बंद पडत असलेल्या उद्योगधंद्यांवर लक्ष द्या, अन्यथा नक्षलवादाला पुन्हा प्रोत्साहन मिळेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलाय. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.
या प्रश्नावर राजकारण न करता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बैठक घेण्याचा आग्रह करणार असल्याचंही पवार म्हणालेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी आज शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांसारख्या विविध समाज घटकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि योग्य ठिकाणी त्यांचा पाठपुरवठा करण्याचं आश्वासन दिलं.
शरद पवार यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावर राज्य आणि केंद्र सरकार ला गंभीर इशारा दिला. त्यांच्या मते श्रमिकांचा जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कोळसा खाण, पेपर मिल, जंगल आणि इतर उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या इथे फार मोठी आहे. शेती शिवाय या जिल्ह्यात लोकांना रोजगाराचा दुसरा पर्याय नाही आणि शेती ही मर्यादित आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात बंद पडत जाणारे उद्योग चिंतेची बाब आहे.
सरकारने वेळीच यावर लक्ष दिले नाही तर नक्षलवादाला पुन्हा एकदा प्रोत्साहन मिळेल. या प्रश्नावर राजकारण न करता आपण उद्या मुंबईला गेल्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून या बाबतीत बैठक घेण्याचा आग्रह करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
१८ वर्षांनी शहरात आलेल्या शरद पवार यांनी बंद पडणारे उद्योग, बेरोजगारीचे संकट आणि शेतकरी मुद्यावर सरकारला आरसा दाखवून पुढील आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे.