Chhattisgarh Accident : छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) बुधवारी मध्यरात्री एक भीषण अपघात (Accident News) घडलाय. या अपघातात एकूण 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे लग्न आटोपून हे वऱ्हाडी घरी परतत होते. मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातल अन् 11 जणांना जीव गमवावा लागला आहे. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात एसयूव्ही आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 5 महिला आणि 2 मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच छत्तीसगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगतारा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातातील मृत आणि जखमी हे धमतरी जिल्ह्यातील सोराम-भटगाव गावचे रहिवासी आहेत. लग्नसमारंभ आटोपून हे सर्वजण बोलेरो गाडीने घरी परतत होते. त्याचवेळी धमतरी-कांकेर राष्ट्रीय महामार्गावर कांकेरकडून येणारा ट्रक आणि बोलेरोची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती बोलेरो गाडीचा यामध्ये अक्षरक्षः चुराडा झाला. मृतांमध्ये 4 पुरुष, 5 महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे. बोरेलो गाडीतून 6 महिन्यांच्या चिमुरडीसह एकूण 11 जण प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच पुरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
Chhattisgarh |10 killed and one child seriously injured after a truck and car collided near Jagatra in Balod district. The injured has been referred to Raipur for better treatment. Search for the driver of the truck underway: Jitendra Kumar Yadav, SP Balod pic.twitter.com/imklW8bqlP
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) May 3, 2023
पुरूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अरुण कुमार साहू यांनी सांगितले की, "या घटनेत जीव गमावलेले लोक कांकेर जिल्ह्यातील मरकाटोला गावातून लग्न समारंभ आटोपून घरी जाताना त्यांची बोलेरो ट्रकला धडकली. गाडीतील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका सहा महिन्याच्या चिमुकल्याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर ट्रक चालकाने पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत."
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख
दरम्यान, या घटनेनंतर छत्तीगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दुःख व्यक्त केले आहे. "बालोदमधील पुरूर आणि चरमा दरम्यान लग्न समारंभासाठी जाणारी बोलेरो आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना धैर्य देवो," असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे.