महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा; मुंबईपेक्षा पुण्यावरुन जास्त जवळ आहे

Beaches In Maharashtra : महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा कोणता. हा समुद्र किनारा मुंबई आणि पुण्यापासून किती अंतरावर आहे. इथं पाहण्यासारखे काय आहे जाणून घेऊया. 

वनिता कांबळे | Updated: Dec 12, 2024, 08:53 PM IST
महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा; मुंबईपेक्षा पुण्यावरुन जास्त जवळ आहे  title=

Ratnagiri Guhagar : महाराष्ट्राला मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. कोकण किनारपट्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे असे म्हणायला हरकत नाही. कोकणातील सुंदर स्वछ समुद्र किनारे गोव्यासह परदेशातील समुद्र किनाऱ्यांना देखील टक्कर देतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा हा  मुंबईपेक्षा पुण्यावरुन जास्त जवळ आहे. जगभरातून पर्यटक या समुद्र किनाऱ्याला भेट देण्यासाठी येतात. जाणून घेऊया हा समुद्र किनारा कोणता आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण; सातपुडा पर्वतात रांगेतील छुपं पठार, खास सुर्योदय पाहण्यासाठी येतात पर्यटक

महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा हा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात आहे. वाशिष्ठी नदी  आणि जयगडच्या खाडीजवळ गुहागर आहे. अथांग सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे गुहागरचे प्रमुख आकर्षण आहे. गुहागर शहराला लाभलेल्या समुद्रकिनारा तब्बल सात किलोमीटर लांब आहे. चेन्नई येथील मरीना बीच 12 किलोमीटर लांब आहे.  मरीना बीच हा जगात तिसऱ्या स्थानावर आहे.

हे देखील वाचा... मुंबई आणि पुण्याच्या मधोमध असलेलं जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ; अथांग समुद्र आणि बरचं काही...

गुहागर, पालशेत, अडूर - बुधल, बोऱ्याबंदर, हेदवी, वेळणेश्वर, रोहिले, तवसाळ हे गुहागरमधील समुद्र किनारे आहेत. यापैकी बहुतांश समुद्र किनारे हे पर्यटकांपासून अलिप्त आहेत. यामुळे पर्यटकांची फारशी गर्दी नसते. इथल्या शांत, निवांत समुद्र किनाऱ्यावर फिरताना लाटांचा आवाज कानात घुमतो. इथलं निसर्ग सौंदर्य पाहून मन हरखून जाते. समुद्र किनाऱ्यावर फिरताना पांढरी शुभ्र वाळूंचा पायांना गुदगुल्या करते.   

समुद्र किनाऱ्यांसह गुहागरमध्ये नैसर्गिक चमत्कार देखील पहायला मिळतात. हेदेवी समुद्र किनाऱ्यावर वर्षानुवर्षे समुद्राच्या लाटांचा मारा होऊन येथील खडकावर एक मोठी अरुंद भेग (घळ) निर्माण झाली आहे. भरतीच्यावेळी समुद्राचे पाणी या घळईत जोराने घुसते. यानंतर या घळीतून एखाद्या कारंज्याप्रमाणे पाणी वेगाने वर उसळते. ही घळ ‘बामणघळ’ म्हणून प्रसिद्ध आहे. गुहागरमध्ये एक  छुपा समुद्र किनारा आहे. हे ठिकाण बुधल सडा नावाने ओळखले जाते. इथं चंद्रकोरच्या आकाराची खोच आहे.   
गुहारग तालुक्यात अनेक धार्मिक पर्यटनस्थळ देखील आहेत. भगवान शंकरांचे वास्तव्यस्थान ‘गुह्यवन’ म्हणून गुहागर ओळखले जाते. दगडी बांधणीचे व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत आहे. दशभूज गणेशाचे मंदिर देखील तितकेच लोकप्रिय आहे. 

मुंबई ते गुहागर हे अंतर 298 किमी इतके आहे. तर, पुण्यापासून गुहागर हे 267 किमी अंतरावर आहे.  गुहागर हे रत्नागिरी, पुणे आणि मुंबईशी रस्त्याने जोडले गेलेले आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने गुहागरला जाता येते. तसेच कोकण रेल्वेवरील चिपळूण या रेल्वे स्थानकावर उतरुन परिवहनच्या किंवा खाजगी बसेसनी गुहागरला जाता येते.