Vegetables Inflation: राज्यात निवडणुकीसोबत भाज्यांचे भावही तापू लागले आहेत. आगामी निवडणुकांच्या तोंडावर महागाईही वाढू लागली आहे. किरकोळ बाजारात लसूण 500 रुपये दराने विकला जात आहे तर कांदा 80 रुपये किलो झाला आहे. हिवाळ्यात येणारा वाटाणाही 250 पार झाला आहे. निवडणुकीच्या काळात झालेल्या या भाववाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
मागच्या आठवड्यात बाजार समितीत कांदा 18 ते 48 रुपये किलो दराने विकला जात होता. हाच कांदा आता 35 ते 62 वर पोहचला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 75 ते 80 रुपये झाला आहे. दोन आठवडे कांदा दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर वाशी सेक्टर 17 या उच्चभ्रू वसाहतीमधील मार्केटमध्ये हेच दर 100 रुपये किलो एवढे आहेत. परतीच्या पावसाचा फटका कांदा उत्पादनावर झालेला दिसत आहे. यामुळे कांद्याची आवक कमी होऊ लागली आहे.
हे ही वाचा: डेंग्यू,टीबी, मधुमेह, डायरिया... मुंबईकरांच्या आजारात टॉपवर कोणता आजार?
किरकोळ बाजारामध्ये लसूण 500 रुपये किलो दराने विकला जात आहे. नवीन वर्षात नवीन पीक बाजारात येईपर्यंत लसूणची भाववाढ सुरूच राहण्याची शक्यता आहे.
हिवाळ्यात येणाऱ्या वाटण्याचेही भाव महागले आहेत. बाजार समितीमध्ये वाटाणा 160 ते 200 रूपये किलो दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारात वाटण्याचा दर 250 रूपये किलोपर्यंत पोहचले आहेत. बाजारात हिरव्या वाटाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. किरकोळ बाजारात मेथीची जुडी 30 रुपये किलो दराने विकली जात आहे. तर लसूणच्या दरही कडकडले आहेत. बुधवारी बाजार समितीमध्ये लसूण 220 ते 320 रुपये किलो दराने विकला जात होता. शेवग्याच्या शेंगाचे दर किरकोळ बाजारात 130 रूपयांवर पोहचले असून वालाच्या शेंगा 120 रुपयांना विकल्या जात आहेत.