आठ दिवसात दहा खून; पुण्यात खळबळ

किरकोळ कारणावरून थेट टोकाचे पाऊल उचलण्यात येत असून, यातील बहुतांश घटना या पूर्ववैमनस्यातून घडत आहेत.

Updated: Nov 20, 2022, 07:12 PM IST
आठ दिवसात दहा खून; पुण्यात खळबळ title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे(Pune) शहरात हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.  गेल्या दहा दिवसांमध्ये शहराच्या विविध भागात आठ जणांचे खून झाले आहेत. पूर्ववैमनस्य प्रेमप्रकरणासह इतर कारणांतून या हत्या झाल्या आहेत. किरकोळ कारणावरून थेट टोकाचे पाऊल उचलण्यात येत असून, यातील बहुतांश घटना या पूर्ववैमनस्यातून घडत आहेत(Criem News).

मागील आठवडयात  12 नोव्हेंबर रोजी येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात दोघांवर कोयत्याने वार करून त्यांना निर्घुणपणे संपविण्यात आले. अनिल उर्फ पोपट भीमराव वाल्हेकर, सुभाष उर्फ पापा किसन राठोड अशी मृतांची नावे आहेत. यातील आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली असून, पूर्ववैमनस्यातून या हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

हत्या झालेले दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ही घटना ताजी असतानाच दोन दिवसांपूर्वी कोंढव्यातील एका 25 वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. सुमित उर्फ मोन्या जाधव असे त्याचे नाव आहे.  मृत जाधव याच्याशी असलेल्या जुन्या वादातून तिघांनी मिळून जाधवला कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. विशेष म्हणजे या खुनाच्या गुन्ह्यात दोन अल्पवयीन आहेत.

तर, मूळच्या बिहार राज्यातील आणि सध्या भोसरी येथे वास्तव्य करणाऱ्या तिघांनी फुरसुंगी भागात एका सुरक्षारक्षकाचा खून केला. काशिनाथ कृष्णा महाजन (वय 52 वर्षे) असे खून झालेल्याचे नाव आहे.  पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, कंपनीच्या गोडावूनमध्ये चोरी करण्यासाठी त्यांनी सुरक्षारक्षक असलेल्या कर्मचाऱ्याचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. 

पूर्ववैमनस्यासह किरकोळ वाद आणि प्रेमप्रकरणातून चतुःशृंगी आणि लोणी काळभोर, चंदननगर भागात खुनाच्या घटना समोर आल्या आहेत.  दारू पिण्याच्या कारणातून लोणी काळभोर भागात तर, करणी केल्याच्या संशयावरून एकाने आपल्याच नातेवाईक असलेल्या महिलेचा गळा चिरल्याची घटना चंदननगर भागात घडली आहे.

खून करून स्वतः जीवन संपविले

प्रेमप्रकरणातून औंध परिसरात महाविद्यालयीन तरुणीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून तिचा खून केल्यानंतर पसार झालेल्या तरुणाने देखील मुळशी परिसरातील एका जंगलामध्ये गळफास घेऊन जीवन संपविले. चतुःशृंगी पोलिसांना तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. दोघेही एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे होते.