Cidco Houses in Navi Mumbai: मुंबईत हक्काचं घर घेण्याऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला हक्काचं घर नवी मुंबईत घेता येणार आहे. सिडको नवी मुंबईत गृहसंकुल उभारणार आहे.नावडे नोडमध्ये दोन खोल्यांची घरे सिडको बांधणार आहे. तेव्हा मध्यमवर्गीयांचं घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे. दरम्यान, काही घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोकडून पुन्हा एकदा घरांची लॉटरी काढली आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ही घरे देण्यात येणार आहेत.
नावडे या नव्याने विकसित होणाऱ्या नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी स्वतंत्र टाऊनशिप उभारण्याचा प्रस्ताव सिडकोने तयार केला आहे. यंदाच्या वर्षीच या घरांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही घरे खासगी विकासकांपेक्षा स्वस्त असतील अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी दिली आहे.
दरम्यान, याआधी सिडकोने लॉटरी काढण्याच्या आपल्या पारंपारिक धोरणाला मागे सारले आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ऑफर केलेली घरे विकण्याची योजना आखली आहे.त्यानुसार घरांची लॉटरी काढली आहे. याची सोडत लवकरच ठाणे येथे होणार आहे. आता सिडकोने दोन खोल्यांचे घर हा नवा पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबविली. यापैकी जवळपास सात हजार घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. पैसे देऊ न शकल्याने अनेक ग्राहकांनी काही घरे परत केली आहेत. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अनेकांचे वाटप रद्द झाले आहे. यापूर्वी सिडकोच्या गृह योजनेत ग्राहकांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या म्हाडाकडून घरांची सोडत काढण्यात येणार आहे. एप्रिलचा अखेरचा आठवडा किंवा मे महिन्याचा पहिला आठवडा या कालवधीत घरांची सोडत निघणार आहे. ज्यानंतर पुढील 45 दिवसांच्या कालावधीत अर्जासाठीची नोंदणी, अर्जविक्री आणि पुढील प्रक्रिया असणार आहे. सोडत जून - जुलै महिन्यात निघण्याची शक्यता आहे.
म्हाडाच्या या सोडतीमध्ये सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार सर्वात महागड्या घराची किंमत तब्बल 4 कोटींपेक्षाही जास्त आहे. अंधेरीतील जुहू विक्रांत येथे असणाऱ्या या घरासाठी 4 कोटी 38 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तर, गोरेगावच्या पहाडी भागात असणाऱ्या घरांच्या किमती कमी असल्याचं कळत आहे. अत्यल्प गट - 2611 घरं , अल्प गट - 1007 घरं, मध्यम गट - 85 घरं , उच्च गट - 116 घरे असणार आहेत.