Brother Attack Sisters Boyfriend: नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील वाशी येथे मंगळवारी सायंकाळी एका तरुणावर चाकू हल्ला करुन त्याला गंभीर जखमी करण्यात आलं. हा हल्ला केला जात असतानाच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी हल्लेखोरांना शरण येण्यास सांगितलं. मात्र ते थांबले नाहीत. अखेर पोलीस अधिकाऱ्याने आपली पिस्तूल काढून हल्लेखोरांच्या दिशेनं रोखली. पोलीस अधिकाऱ्याच्या हातातील पिस्तूल पाहून आरोपींनी भीतीने गाळण उडाली. हात वर करुन सरेंडर सरेंडर म्हणत ते जमीनीवर झोपले.
पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेऊन जखमी व्यक्तीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये हलवलं आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हल्लेखोरांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचं नाव हसन इरशाद सिद्दीकी असं आहे. हसन हा कोपरखैरणे येथे राहतो. हसनची बहीण अर्बिकाचं आणि तिचा मित्र निजामू खानचं प्रेमप्रकरण सुरु होतं. अर्बिकाला निजामूबरोबर लग्न करायचं होतं. मात्र लगेच लग्न करण्यास निजामूचा विरोध होता. त्याने आताच लग्न करता येणार नाही असं अर्बिकाला सांगितलं. नाराज झालेल्या अर्बिकाने निजामू लग्नाला नकार देत असल्याची माहिती आपल्या भावांना दिली. त्यानंतर अर्बिकाचा भाऊ हसन त्याच्या काही मित्रांना बरोबर घेऊन वाशी रेल्वे स्टेशनजवळ निजामूला गाठलं. बहिणीशी लग्नाला नकार दिल्याच्या मुद्द्यावरुन जाब विचारत हसन आणि त्याच्या मित्रांनी निजामूला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हसन निजामूवर चाकूने वार करु लागला.
रस्त्यावर सुरु असलेला हा गोंधळ पाहणाऱ्या बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली. मात्र हसनच्या हातातील चाकू पाहून कोणीच निजामूला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही. सुदैवाने काही अंतरावरच एक पोलिसांची गस्त घालणारी गाडी होती. एक पोलीस अधिकारी धावतच घटनास्थळी पोहोचला आणि त्याने आरोपींना शरण येण्यास सांगितलं. जखमी तरुणापासून दूर व्हा आणि शरण या असं पोलिसांनी सांगितल्यानंतरही आरोपी जखमी तरुणाला सोडण्यास तयार नव्हता. अखेर पोलीस अधिकाऱ्याने आपली पिस्तूल काढून हल्लेखोरांच्या दिशेने रोखली.
पोलीस अधिकाऱ्याने आपल्या दिशेने रोखलेली पिस्तूल पाहून आरोपींची भंबेरी उडाली. दोघांनी पिस्तूल पाहताच हात वर करुन शरण आल्याचं जाहीर करत लोटांगण घातलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.