मुंबई : बॉलीवुड अभिनेता अरबाज खानने आपण गेल्यावर्षीच्या आयपीएल सट्टेबाजीत २.७५ कोटी हरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतरही पोलिस अधिकाऱ्यांच्या हाती नवी माहिती येत आहे. बुकी सोनू जालानचे अरबाजसहित इतर अनेक सेलिब्रेटींसोबत संबध होते असे वृत्तही हाती आले आहे. सोनूचे फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत. सोनूचे काही प्रसिद्ध सेलिब्रेटींसोबत घनिष्ट संबध असल्याचा खुलासा ठाणे पोलिसांनी केला. एवढंच नव्हे तर सट्टेबाजीत हारलेल्या अरबाज खानला पब्लिक इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचा दबाव सोनू टाकत असल्याचेही उघड झाले आहे.
अभिनेता अरबाज खान आणि सट्टेबाज सोनू जालान यांच्या ५ तासांच्या चौकशी दरम्यान बॉलीवूडमधील अजून ७ नावं सट्टेबाजीमध्ये अडकल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे सोनूला एका बड्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याचं समोर येतंय. सट्टेबाजीच्या धंद्यात हा माजी पोलीस अधिकारीच सोनूला मदत करत असल्याचं उघड झालंय. तसंच दोन बारबालांच्या मदतीने सोनू फ्लॅट खरेदीत पैसे गुंतवत असल्याचंही उघड झालंय. बारबालांच्या नावे त्याने अडीच-अडीच कोटींचे फ्लॅट घेतल्याचं उघड झालंय.
सोनू जालान भेटलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ शूट करुन त्याला ब्लॅकमेल करत असे. अरबाजचा फोनही रेकॉर्ड करुन तो अरबाजला ब्लॅकमेलला करत होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. याप्रकरणात फिल्म निर्माता पराग संघवी हा सोनूचा सट्टेाबाजीमध्ये पार्टनर असल्याचं समोर आलं आहे. सोनू नामांकित व्यक्तींना सट्टेबाजीच्या जाळ्यात ओढून त्यांचा आपला धंदा वाढवण्यासाठी वापर करत असे. अरबाजचादेखील त्यानं आपला धंदा वाढवण्यासाठी उपयोग केला आणि काही अभिनेते, अभिनेत्री आणि दिग्दर्शकांना त्यांनं जाळ्यात ओढलं.