महाराष्ट्रातील दंगलींमागे कोण? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले "हे सगळं..."

महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करणार त्यांना अद्दल घडवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. तसंच विधानसभा अध्यक्षांवर कितीही दबाव आणला तरी ते योग्य निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 15, 2023, 12:41 PM IST
महाराष्ट्रातील दंगलींमागे कोण? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले "हे सगळं..." title=

Devendra Fadnavis on Law and Order: अकोल्यातील जुने शहर येथे एका सोशल मीडिया पोस्टवरुन उसळलेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे. तसंच 10 पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच अहमदनगरच्या शेवगाव शहरात रात्री दोन गटात वाद निर्माण होऊन दगडफेक झाली. दरम्यान महाराष्ट्रात कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करणार त्यांना अद्दल घडवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराच दिला आहे. 

"सध्या दोन्ही ठिकाणी शांतता आहे. पोलीस पूर्पणे अलर्ट होते. माहिती मिळताच सर्व पोलीस तिथे पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करणार त्यांना अद्दल घडवल्याशिवाय शांत बसणार नाही," असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. 

"100 टक्के हे जाणुनबुजून होत आहे. याला कोणाची तरी फूस आहे. जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ते यशस्वी होणार नाहीत. जे हे करत आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

या दंगलीने राजकीय हेतून प्रेरित आहेत का? असं विचारण्यात आलं असता फडणवीस म्हणाले की. "काही प्रमाणात या दंगली राजकीय हेतून प्रेरित आहेत. काही संस्था, लोक जे मागून आग लावण्याचा, तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत. मी हे सगळं बाहेर आणणार". 

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आमदार अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय घेण्यासाठी ठाकरे गटाकडून देण्यात येणाऱ्या निवेदनावरही भाष्य केलं. ठाकरे गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्षांना 79 पानांचे निवेदन देण्यात आलं असून, सुप्रीम कोर्ट निर्णयाचे सर्व तपशील या निवेदनात नमूद केले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्ट निर्णयाच्या चौकटीत राहून निर्णय देण्याचे निवेदनात नमूद आहे. 

"जे काही सुरु आहे हे कोणत्या लोकशाहीत बसणारं आहे. आम्ही विधानसभा अध्यक्षांना घेराव घालू, चालू देणार नाही, फिरु देणार नाही असं बोललं जात आहे. अशा दबावातून विधानसभा अध्यक्ष कधीच निर्णय घेत नाहीत. तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा. तुमची बाजू कमकुवत आहे म्हणून अशी भाषा वापरणं सुरु आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

"विधानसभा अध्यक्ष निष्णांत वकील असून, कायदा समजणारे आहेत. वर्षानुवर्षे त्यांनी प्रॅक्टिस केली असून ते कोणतंही बेकायदेशीर काम करणार नाहीत. कोर्टाने जास्त वेळ वाया न घालवता निर्णय घ्या सांगितलं आहे, त्याचा अर्थ त्यांना कळतो. ते योग्य प्रकारचा निर्णय घेतील. कोणी कितीही दबाव आणला तरी ते त्याला बळी पडणार नाहीत," असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.