Rajya Sabha Election : देशात राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर प्रत्येक पक्ष उमेदवाऱ्यांच्या नावाची चर्चा करत आहेत. येत्या 27 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 6 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरु झाली असून तीन नावांची जोरदार चर्चा होत आहे. (Big news Will Vinod Tawde Pankaja Munde get Rajya Sabha Election ticket bjp candidate maharashtra)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. विनोद तावडे सध्या भाजपचे बिहारचे प्रभारी आहेत. बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्याने राज्यसभेसाठी तावडेंचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. केंद्रीय नेतृत्व लवकरच यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचंही सूत्रांनी म्हटलंय.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून कायम बाजूला केल्याची चर्चा राजकारणात रंगली आहे. अनेक वेळा पंकजा मुंडे यांनीही भाजपविरोधात आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्या एकदा अशाही म्हणाल्या होत्या की, भाजप हा माझा पक्ष आहे पण भाजप मला आपलं मानत नाही. त्यामुळे पंकजा मुंडे बंडखोरी करतील का असा प्रश्न अनेक वेळा उपस्थित झाला आहे? जेव्हा कधी उमेदवारीचा प्रश्न येतो पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा झाल्याच समोर येतं. मात्र प्रत्यक्षात त्यांना डावलं जातं. त्यामुळे भाजप पक्षाकडून पंकजा मुंडे यांना बाजूला केलं जातंय अशी नाराजी समर्थकांमध्ये पसरली आहे.
तरदुसरीकडे पंकज मुंडे राष्ट्रवादीत जाऊ शकते, अशी बातमी पुढे आली होती. त्यानंतर पंकजा मुंडेंनी या सर्व बातम्या खोडून काढल्या आणि त्यानंतर त्या भाजपमध्ये राहूनच विरोध करताना दिसून येतं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी बंडखोरी करु नये म्हणून भाजप पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा विचार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता भाजप नेमकं काय गणित खेळतं हे वेळच ठरवेल.
राज्यसभेतून माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण निवृत्त होणार आहे. त्यात आता राज्यसभेसाठी निवृत्त खासदारांना पुन्हा संधी मिळणार की नवीन उमेदवाऱ्यांना संधी मिळणार हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे. एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण दिवसेंदिवस तापणार आहे हे नक्की.