विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : आधुनिक भौतिक सुखात आपण आपले अस्सल पारंपरिक प्रथा विसरत जात आहोत... आजची पीढ़ी फेसबुक-व्हाट्सअॅपच्या चक्रात एवढी अड़कली आहे की 'भोंडला' काय आहे? हे अनेकांना माहितही नसेल... आपल्या भावी पिढीला आपली परंपरा माहीत व्हावी, या हेतूनेच अनाथ मुलींसाठी औरंगाबाद येथील सामाजिक संस्थांनी 'भोंडला' हा पारंपरिक खेळ आयोजित केला होता. ज्यामुळे अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुललाय. भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत काळाच्या ओघात भोंडल्याची परंपरा लोप पावत चालली आहे. ती जिवंत ठेवण्यासाठी आस्था जनविकास संस्था आणि सेवा फाऊंडेशननं हा उपक्रम साजरा केला.
औरंगाबादच्या भगवान बाबा अनाथ आश्रमातल्या मुलींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना यावेळी दिसत होता. या मुलींनी पारंपरिक भोंडला खेळाचा आनंद लुटला. हस्त नक्षत्राचं प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा मधोमध ठेवून तिच्याभोवती मुली फेर धरतात... ऐलमा,पैलमा गणेश देवा, शिवाजी आमचा राणा, एक लिंबू झेलू बाई एक लिंबू झेलू आणि अक्कन माती चिक्कन माती यांसारख्या पारंपरिक गीतांवर मुलींची पावलं थिरकली...
भोंडल्यामध्ये गाणी आणि खेळ झाल्यानंतर डब्यातील खाऊ ओळखण्याचा मजेशीर खेळ असतो. डब्बा हलवून डब्यात काय आहे हे ओळखयाचं आणि खावू मिळवायचा. भोंडल्याला काही ठिकाणी हादगा, भुलाबाई असेही म्हटलं जातं. मराठवाड्यात याची ओळख भूलाबाई अशीच आहे. या सगळ्यात मुलींचा आनंद तर पाहण्यासारखा होता. त्यांनीही या खेळाची मजा आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवलीय.
लोप पावत चाललले आपले पारंपरिक खेळ, प्रथा जपल्या गेल्या पाहिजे आणि त्यासाठी आपणही खारीचा वाट उचलला पाहिजे हेच या खेळाच्या माध्यमातून दिसतेय.