चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : खाकी वर्दी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो कडक शिस्तीचा माणूस. मात्र, त्याच्या मनातही प्राणी मित्र लपला असतो हे बदलापूरतील एका प्रसंगावरून समोर आले आहे. एक जखमी कुत्र्याला (injured dog)पोलिसांनी जीवदान दिले आहे. बदलापूर पोलिसांनी(Badlapur police) वर्गणी काढून कुत्र्याच्या पिलाचे ऑपरेशन केले आहे. पोलिसांच्या या माणुकसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रस्त्याच्या कडेला दुचाकी पायावरून गेल्याने तीन महिन्याचे एक कुत्र्याचे पिल्लू जीवाच्या आकांताने विव्हळत होतं. बदलापूर पश्चिमेकडील पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना हे कुत्र्याचे पिलू दिसून आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून त्याला वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
मात्र, पायावरून बाईकचे चाक गेल्याने त्याचं मागील पायाचा हाड मोडलं होते. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. त्यासाठी खर्च लागणार होता. बदलापूर पश्चिम येथील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावकर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करुन 25 हजार रुपये खर्च करून कुत्र्याच्या पिल्लाच्या पायावर शस्त्रक्रिया केली.
या पिल्लाच्या पायात रॉड आणि प्लेट टाकण्यात आली आहे. आता हे पिल्लू स्वतःच्या पायावर पून्हा एकदा चालायला लागलं आहे. पोलीस स्टेशन मधील कर्मचारी त्याची आपुलकीने देखभाल करत आहेत. पोलिसांच्या मनातही माणूस लपला आहे हे या घटनेवर न दिसून येते. पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.