औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर नेते आमदार अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी त्यानी भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भेट घेतली. त्यामुळे या चर्चेत तथ्य असल्याचे म्हटले जात आहे. एकीकडे सत्तार यांचा भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र सत्तार यांना त्यांच्या मतदारसंघातच विरोध होत आहे. सिल्लोड मतदारसंघातील भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते सत्तार यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे सत्तार यांना होणारा विरोध लक्षात घेता भाजप काय निर्णय घेणार याचीही चर्चा रंगू लागली आहे.
सत्तार यांना विरोध करताना आज या संदर्भात सिल्लोडमध्ये बैठक सुद्धा झाली. या बैठकीला हजारावर कार्यकर्ते उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत सत्तार यांना भाजपमध्ये घेऊ नये, असा सूर या बैठकीत ऐकायला मिळाला. या संदर्भात सिल्लोडचे भाजप नेते आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काही मंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी सत्तार यांना भाजपमध्ये घेऊ नये अशा प्रकारची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत सत्तार यांच्या विरोधात लढलो आणि भाजपला या ठिकाणी मोठे आहे. त्यामुळे सत्तार सारखा दुसऱ्या पक्षातून आलेला माणूस भाजपमध्ये घेऊ नये, अशी या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे, असे सिल्लाडमधील भाजप नेते सुरेश बनकर यांनी सांगितले.