विधानसभा निवडणुकीत निराशा हाती लागल्यानंतर आगामी पालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी नव्या उमेदीनं लढण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केला जात आहे. मात्र पक्षातल्या एकंदर कार्यपद्धतीवर पक्षातूनच टीका होऊ लागली आहे. स्वतः भास्कर जाधव यांनीच पक्षाच्या बदललेल्या कार्यपद्धतीवरून वाभाडे काढले आहेत.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेतूनच टीका होऊ लागली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेनेची काँग्रेस होऊ लागल्याचा गंभीर आरोप केला आहे. पक्षाच्या बदललेल्या कार्यपद्धतीचे भास्कर जाधवांनी जाहीर वाभाडे काढले आहेत.
ज्यांनी गाव सांभाळायचं त्यांनी निवडणुकीत रुसू नये, रागवू नये म्हणून त्यांना सांभाळायची वेळ येते. बरोबर आहे ना राऊत काय अनुभव आहे तुमचा. असाच आहे ना? गावाचा सरपंच आहे त्याचा वगमान काढा. जिल्हा परिषद सदस्यांचा वगमान काढा.पंचायत समिती सदस्यांचा वगमान काढा. वगमान म्हणजे काय तुम्हाला समजतं ना की नाही समजत. त्याचा वगमान काढा शाखा प्रमुखांचा काढा...उल्फा... उल्फा काढा.. असे हे सर्व बिरुद बसले आहे उल्फा...काय चाललंय काय हे? पदाधिका-यांनी समजून जावं आमच्यावर कुणाचं लक्ष नाही, मी काय करतोय? ते तोंडावर बोलत नसतील. कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल जे बोललं ते चांगलं आहे. पण त्याला खरं काय आहे हे माहीत आहे त्याची जाणीव ठेवावी. पदांचा म्हणजे शाखाप्रमुखपदाचा कालावधी निश्चित केला तर तेवढ्या कालावधीत ते काम करण्यासाठी स्पर्धा करतील. न पेक्षा आपल्या पक्षाची जवळ-जवळ काँग्रेस झालीय. जवळ-जवळ काँग्रेस झालीय वेदना होतात हे बोलताना
चिपळूणमधील पदाधिका-यांच्या बैठकीत भास्कर जाधवांनी नेते विनायक राऊत आणि जिल्हाप्रमुख संजय कदमांसमोर खदखद व्यक्त केली. भास्कर जाधवांच्या या वक्तव्याशी असहमत असल्याचं विनायक राऊतांनी सांगितलं आहे. कितीही काही झालं तरी शिवसेना ही शिवसेनाच राहणार असं ठाम उत्तर खासदार विनायक राऊतांनी दिलं आहे.
भास्कर जाधवांनी नाराजीतून हे वक्तव्य केलं असावं असा संजय राऊतांचा कयास आहे. त्यांनी लवकरच भास्कर जाधवांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान माझ्या भाषणाची क्लीप अर्धीच दाखवली गेली. पक्षाच्या खासगी कार्यक्रमातील क्लीप बाहेर आलीच कशी असा सवालही आमदार भास्कर जाधव यांनी स्वपक्षीयांनाच कानपिचक्या लगावल्या.
भास्कर जाधवांनी जाहीर खदखद व्यक्त करण्यामागं अनेक कारणं असू शकतात. कोकणातल्या पराभवाला अनेकजण जबाबदार आहेत त्यांच्याविरोधात भास्कर जाधवांनी जाहीर बोलायला सुरुवात केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भास्कर जाधव विरोधी पक्षनेतेपदाचे दावेदार आहेत. विरोधी पक्षनेतेपद मिळत नाही म्हटल्यावर भास्कर जाधवांनी स्वकियांवरच टीकेचे बाण सोडले नाहीत ना अशी चर्चा कोकणात सुरु झाली आहे.