मुंबई : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यामध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर सत्ताधारी भाजपावर विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडिया आणि इतर सर्वच माध्यमांतून विरोधी पक्ष नेत्यांनी भाजपाच्या पराभवावर आपल्या प्रतिक्रिया देत जनतेने एक मोठा बदल घडवून आणल्याची प्रतिक्रिया दिली. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातूनही भाजपावर थेट शब्दांमध्ये टीका करण्यात आली.
'मतदारांनी नको, त्या नेत्यांना उखडून फेकलं', अशी प्रतिक्रिया देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या उदगारांचे पडसाद या अग्रलेखातूनही उमटल्याचं पाहायला मिळालं. पाच राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या निवडणूकांनंतर एकाही राज्यात भाजपाला काही सत्तेचं गणित धड सोडवता आलेलं नाही असं म्हणत भाजपाशासित राज्यांमध्येच या सत्ताराधारी पक्षाची धूळधाण उडाल्याचं मत अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे.
'हिंदी पट्ट्यातील तिनही राज्यं भाजपाच्या हातून निसटली आहेत. तर, तेलंगाणामध्ये पुन्हा एकदा चंद्रशेखर राव विजयी झाले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी 'काँग्रेसमुक्त भारत'चं जे स्वप्न पाहिलं होतं, त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे. किंबहुना जनतेनेच भाजपामुक्तचा संदेश दिला आहे.'
जनतेकडून उचलण्यात आलेल्या या पावलाचं अग्रलेखातून कौतुक करण्यात आलं असून, त्यांच्या या धैर्यास साष्टांग दंडवत घालत 'थापा मारुन सदा सर्वकाळ विजयी होता येत नाही', ही बाब शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून अधोरेखित करण्यात आली आहे. शिवसेनेकडून देण्यात आलेली ही प्रतिक्रिया पाहता आता राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारची नेतेमंडळी आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.