कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यात अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी काही दिवसांपुर्वच भाजपात प्रवेश केला. त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातही उपस्थिती दाखवली. या पार्श्वभुमीवर आता स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करण्याची तारीख नारायण राणे यांनी जाहीर केली आहे.
कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 15 तारखेला जाहीर सभा होणार असून या सभेत स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. सावंतवाडी आणि कुडाळ येथे राणेंच्या आज बैठका झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी नारायण राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. राजन तेली आणि राणे यांच्यामध्ये काही वर्षांपासून सुरु असलेला संघर्ष आज मिटला आहे. आपला भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांना पूर्ण पाठींबा आहे असे राणेंनी यावेळी जाहीर केले.