नाशिक : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आणखी एक दणका बसलाय. 'आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या मालमत्तेवर थकीत कर्जाच्या वसुलीसाठी नाशिक मर्चंटस् सहकारी बँकेने जप्ती आणलीय. दोन महिन्यांत कर्ज न भरल्यास मालमत्तेची विक्री करून वसुली केली जाणार आहे.
आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर... नाशिक येवला मार्गावर असलेल्या ओढा गावानजिक ही पारंपरिक ऊर्जा उत्पादन करण्यासाठी स्थापन करण्यात आली. या कंपनीसाठी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड न झाल्याने नाशिक मर्चंट बँकेने या कंपनीच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. कर्जाची मूळ रक्कम चार कोटी ३४ लाख ४३,१८३ रुपये असून १ ऑक्टोबर २०१७ पासून त्यावरील व्याजाची रक्कम थकीत आहे. ही रक्कम भरण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली असून, या मुदतीत कर्जाची फेड न झाल्यास मालमत्तेची विक्री करणार असल्याचे बँकेने सूचित केले आहे.
या कंपनीत समीर सह शेफाली आणि विशाखा भुजबळ यांच्या नावे बिगरशेती ४२५० चौ मीटर तर ६०.४७ चौ मीटरवर बांधलेल्या कार्यालयाचाही त्यात समावेश आहे.
भुजबळ काका पुतण्यासह संचालक सत्येन केसरकर, दिलीप खैरे, विशाखा भुजबळ, शेफाली भुजबळ हे जामीनदार आहेत. माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ हे पुतण्या समीरसह गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात आहेत.
यापूर्वी स्टेट बँकेने मालमता लीलावात काढण्याची नोटीस दिली होती. आता मालमत्तेवर टाच आणल्याने राजकीय प्रस्थ असलेल्या भुजबळांना दणका मिळाला आहे.