मंत्रीपदी असताना मुंडेंच्या पत्नीकडं आर्थिक लाभाचे पद कसं? अंजली दमानियांचा सवाल

अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आर्थिक लाभाचे पद असल्याचा दावा करत ताबडतोब त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केलीय.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 18, 2025, 02:08 PM IST
मंत्रीपदी असताना मुंडेंच्या पत्नीकडं आर्थिक लाभाचे पद कसं? अंजली दमानियांचा सवाल title=

Anjali Damania : अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी या लाभाच्या पदावर असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. झी 24 तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रिज या कंपनीच्या संचालकपदी असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. मंत्रिपदावरील व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय लाभाच्या पदावर नसले पाहिजेत असा नियम आहे. हा नियम राजश्री मुंडे यांनी मोडल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. 

व्यंकटेश्वरा कंपनी महाजनकोतून बाहेर पडणारी फ्लाय ऍश पुरवठादार कंपनी आहे. या कंपनीतून थेट लाभ मंत्र्यांच्या घरात जात असल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केलाय. 

धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या

वेंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजोरिटी शेयरहोल्डर मंत्री धनंजय मुंडे व राजश्री धनंजय मुंडे आहेत. ह्यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते, आजही ते शेयरहोल्डर आहेत. ही कंपनी fly ash विकते ? महाजनको ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. असे असताना देखील राज्य सरकारमधील एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यासोबतच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घ्या असं त्यांनी म्हटलं आहे. तर त्या कंपनीचे काही पुरावे दमानिया यांनी दिले आहेत, ज्यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही आहे. 

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करा. त्याचबरोबर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी देखील हिंगोली जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.