आंबेनळी अपघात: 'त्या'३० जणांना कोकण कृषी विद्यापीठामध्ये श्रद्धांजली

राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

Updated: Jul 30, 2018, 01:56 PM IST
आंबेनळी अपघात: 'त्या'३० जणांना कोकण कृषी विद्यापीठामध्ये श्रद्धांजली title=

दापोली: आंबेनळी घाटातल्या अपघातात मृत्यू झालेल्या तीस जणांना आज दापोलीतल्या कोकण कृषी विद्यापीठामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.  कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरु तपस भट्टाचार्य, आमदार संजय केळकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ संजय भावे उपस्थित होते. या श्रद्धांजली कार्यक्रमात अनेकांना अश्रू अनावर झाले होते. दापोलीतल्या कृषी विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांची महाबळेश्वरला सहल गेली होती. त्यावेळी आंबेनळी घाटात बस कोसळून या तीस जणांचा मृत्यू झाला.

दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसला आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बसमध्ये असलेल्या ३१ जणांपैकी ३० जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकास जिवदान मिळाले.  मृतांपैकी सर्वच्या सर्व ३० जणांचे  मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनेतील सर्वांचे मृतदेह हाती लागल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.

बस घसरली आणि थेट ३०० मीटर खोल दरी कोसळली

दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी मिनीबसमधून सहलीसाठी मोठ्या आनंदाने आणि उत्साहात निघाले. सकाळी सातच्या सुमारास निघालेल्या या कर्मचाऱ्यांनी खेडमध्ये नाश्ता केला आणि फोटोसेशनही झालं. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. महाबळेश्वरच्या दिशेने जात असताना क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मातीच्या ढिगाऱ्यावरुन बस घसरली आणि थेट ३०० मीटर खोल दरी कोसळली.

मृतांच्या कुटुंबियांना राज्यसरकारची ४ लाखाची मदत

दरम्यान, राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.