जिल्हा शल्य चिकित्सकांवर परिचारिकांच्या शोषणाचा आरोप

जिल्हा शल्य चिकित्सकांकडूनच महिला परिचारिकांचं शोषण झाल्याची तक्रार सार्वजनिक आरोग्य परिचारिका संघटनेणं केल्यान खळबळ उडालीय.

Updated: Nov 11, 2017, 10:21 PM IST
 जिल्हा शल्य चिकित्सकांवर परिचारिकांच्या शोषणाचा आरोप title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांकडूनच महिला परिचारिकांचं शोषण झाल्याची तक्रार सार्वजनिक आरोग्य परिचारिका संघटनेणं केल्यान खळबळ उडालीय.
 

आपल्यावर चुकीचे आरोप-जिल्हा शल्य चिकित्सक

शासनाच्या आरोग्य विभागातील सरळ सेवा भरतीतील निवड झालेल्या महिला परिचारिकांना फिजिकल फिटनेसचे दाखले देताना हा प्रकार झाल्याचा आरोप केला जातोय. याबाबत मात्र आपल्यावर चुकीचे आरोप करून बदमान केले जात असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलंय. 

५ परिचारिकांची सरळ सेवा भरतीत निवड

जळगाव जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या ४५ परिचारिकांची सरळ सेवा भरतीत निवड झालीय. त्यासाठी सेवेत दाखल झाल्यांनतर ३ महिन्याच्या आत फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट देणे निवड झालेल्या उमेदवाराला बंधनकारक राहते. 

महिला परिचारिकांची वैद्यकीय तपासणी

वर्ग तीन आणि चारच्या कमर्चाऱ्यांची सर्टिफिकेट देण्याचा अधिकार स्थानिक जिल्हा शल्य चिकित्सकांना असतो. त्याप्रमाणे काही महिला परिचारिकांची वैद्यकीय तपासणी जळगाव जिल्हा रुग्णालयात करण्यात आली. ८ परिचारकांची जिल्हा शल्य चिकित्सकांनी आक्षेपार्ह शारीरिक तपासणी केल्याची तक्रार पीडित परिचारिकांनी संघटनेकडे केलीय.

महिला कर्मचाऱ्यांकडूनच तपासणी

महिला परिचारिकांची तपासणी करताना आपल्यासोबत महिला कर्मचारी असल्याचा दावा जिल्हा शल्य चिकित्सकांनी केला असून जिल्हा रुग्णालयात कडक शिस्त लावल्यानं आपल्यावर चुकीचे आरोप करून आपल्याविरुद्ध कटकारस्थान रचलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

६ डॉक्टरांची समिती गठीत

दरम्यान, आरोपानंतर उर्वरित परिचारिकांना फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट देण्याकरिता ६ डॉक्टरांची समिती गठीत करण्यात आलीय. त्यात स्त्रीरोग तज्ज्ञ, नाक कान घसा तज्ज्ञ, आर्थोपेडिक आदी डॉक्टरांचा समावेश आहे.

उपसंचालकांकडूनदेखील चौकशी होण्याची शक्यता

या प्रकरणी आता आरोग्य उपसंचालकांकडूनदेखील चौकशी होण्याची शक्यता असून महिला परिचारिकांच्या शोषणाचा आरोप असलेले जिल्हा शल्य चिकित्सकांसह आरोपकर्त्यांनाही या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.