सांगली : राष्ट्रवादीचे नेते अन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मिरज येथे भाजप खासदार संजय पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला आले होते. त्यानंतर ते मिरज येथील शासकीय विश्रामगृहात आले असता पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
यंदा वेळेवर मान्सून येईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यासाठी आम्ही बैठका घेऊन शेतकऱ्यांना बी बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करत आहोत. शेतात ऊस अजूनही शिल्लक आहे. आता रिकव्हरी 10 % वर आली आहे. रिकव्हरी लॉस म्हणून आपण टनाला 200 रुपये देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
बोगस बियाणेसंदर्भात राज्यसरकारने कायदे कडक केले आहेत. विकेल तेच पिकवायचे अशी भुमिका आता सरकारने घेतली आहे. पण, उगवण होत नाही अशी बियाणे दुकानदारांनी ठेवली असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.
कोरोनामुळे विकासकामांना म्हणावा तसा निधी देता आला नाही. मात्र, सांगली महानगरपालिकेला 100 कोटींचा निधी जाहीर करतोय. त्यातील 25 कोटी निधी तातडीने देतो. पण या निधीचा उपयोग योग्य व्हावा. राज्यातील सर्व महानगरपालिका यांनी पुढाकार घ्यावा आणि ड्रेनेज लाईन अंडर ग्राउंड करावा. त्यामुळे ज्या समस्या निर्माण होतात त्या होणार नाहीत असे अजित पवार यांनी सांगितले.
सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही. आज महागाईचा मुद्दा महत्वाचा आहे. पण हनुमान चालीसा, भोंगे, हिंदुत्व असे मुद्दे पुढे आणले जात आहेत. काही जणांना विनाशकालीन विपरीत बुद्धी आलीय. समाजातील वातावरण बिघडणार नाही हे पाहिले पाहिजे.
काल मुख्यमंत्री जर काही बोलले नसते तरीही ते काहीच बोलत नाहीत अशी टीका विरोधकांनी केली असती. मुख्यमंत्री पहाटेच्या शपथविधीबाबत बोलले परंतु मला जेव्हा वाटेल तेव्हा मी त्याबाबत बोलेनच. आता ती वेळ आली आहे असे मला वाटत नाही, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.
अजित दादा यांची ही पत्रकार परिषद सुरु असताना एका पत्रकाराने दादांना मास्क काढा अशी विनंती केली. त्यावर दादांनी मिश्कीलपणे म्हटले की, कोरोनाची सुरुवात झाल्यापासून मी मास्क घालतोय. आता कोरोनाच धोका कमी झाला असला तरी आपली काळजी आपणच घ्यायची आहे असं आरोग्यमंत्री सांगतात. पण बाबा रे... आता दादा मास्क काढा म्हणाल.. नंतर कपडे पण काढा म्हणाशील... तेवढं काही सांगू नको.. दादांच्या या मिश्किलीवर एकच हशा उमटला. मात्र... दादांनी त्या पत्रकारांची ती इच्छा पूर्ण करत मास्क काढला आणि पुढे पत्रकार परिषद सुरु झाली.