Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकरवर राज्यभरातून टीकेची झोड उठली. त्यातच आता राहुल सोलापूरकरांच्या जुन्या विधानामुळे आता वाद निर्माण झाला आहे. राहुल सोलापूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. राहुल सोलापूरकरांनी आपलं विधान मागे घ्यावं, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. तर इतिहासावर बोलणं टाळावं, असा सल्ला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राहुल सोलापूरकरांना दिलाय.
मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात असं विधान केल्याचे समजते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी संताप वक्य करत माफी मागावी अशी मागणी केली आहे.
सोलापूरकर यांचे विधान अत्यंत निषेधार्थ विधान केलं आहे. जे वेद आहेत त्याच्याबद्दल डॉ बाबासाहेबांनी लिहिलेले आहे आणि डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला राहुल सोलापूरकर यांनी काहीही शिकवू नये, राज्य सरकारने तात्काळ सोलापूरकर यांच्यावर कारवाई सरकारने करावी. तसेच राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा आम्ही देत आहोत असं सचिन खरात म्हणाले.
राहुल सोलापूरकरचे तोंड चपलीने फोडा आणि 1 लाख बक्षीस मिळवा अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीनी केली आहे. शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूरकरला फोडून काढा. राहुल सोलापूर जिथे दिसेल तिथे त्याचे तोंड चपलीने रंगवणाऱ्या व्यक्तीला 1 लाखाचे बक्षीस मी जाहीर करतोय असं शरद कोळी म्हणाले.
पेटारे-बिटारे काहीच नव्हतं. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते. त्यासाठी त्यांनी हुंडी वटवली याचे पुरावे आहेत. महाराजांनी औरंगजेबाचा वकील, त्याच्या बायकोला लाच दिली होती. औरंगजेबाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खूण, पुरावे आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हंटलं, की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली, की इतिहासाला छेद दिला जातो असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केले आहे.