मोठा दिलासा ! 45 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध, 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' कळंबोलीत दाखल

राज्यात कोरोनाचा ( Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. बेड आणि ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिवीर औषधाचाही तुटवडा आहे.  

Updated: Apr 27, 2021, 07:34 AM IST
मोठा दिलासा ! 45 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध, 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' कळंबोलीत दाखल   title=

अलिबाग  : राज्यात कोरोनाचा ( Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. बेड आणि ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिवीर औषधाचाही तुटवडा आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचे जीव गेला आहे तर अनेकांना धोका निर्माण झाला आहे. ऑक्सिजनचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवत आहे. राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी सुमारास 45 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या तीन टँकरसह 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'  (Oxygen Express) कळंबोली येथे दाखल झाली.

दरम्यान, मुंबईमध्ये पाठविण्यात येणाऱ्या टँकरपैकी एक टँकर सेव्हन हिल रुग्णालयासाठी तर दुसरा रबाळे,नवी मुंबईसाठी पाठविण्याचे नियोजन आहे. हे टँकर परिवहन विभागाच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांच्या देखरेखीखाली परिवहन विभागामार्फत सुरक्षितरित्या रवाना करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शशिकांत तिरसे यांनी दिली आहे.

नाशिक येथे उतरविण्यात आलेल्या टँकरमधील वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन नाशिकसह, अहमदनगर आणि इतर परिसरातील गरजू रुग्णांना पुरविण्यात येणार आहे. तर कळंबोली येथे आलेले टँकर्स रिलायन्स जामनगर येथून आलेले आहेत. प्रत्येकी 15 मेट्रिक टन असे एकूण 45 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे हे टँकर्स उच्चस्तरीय समितीमार्फत रवाना करण्यात येत असून अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील दोन टँकर हे मुंबईसाठी तर एक टँकर पुण्यासाठी रवाना करण्यात येणार आहे.

विशाखापट्टणम् येथून वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन आणण्याकरिता पनवेलमधील कळंबोली येथून 10 ट्रकची 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'  परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत  १९ एप्रिल २०२१ रोजी रवाना करण्यात आली होती. सोमवारी ही 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'  कळंबोलीमध्ये दाखल झाल्यामुळे कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रविवारी जामनगर येथून निघालेली ही एक्सप्रेस सोमवारी कळंबोली रेल्वे स्थानकात दाखल झाली. जामनगर येथून निघालेल्या या 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' मधील 10 टँकरपैकी तीन टँकर हे नागपूर येथे, चार टँकर हे नाशिक येथे आणि उर्वरित तीन टँकर हे कळंबोली, पनवेल येथे उतरविण्यात आले.