एका शौचालयासाठी मनपानं खर्च केले... २७ लाख!

एखादे शौचालय बांधण्यास किती रुपयांचा खर्च होऊ शकतो? असा प्रश्न कोणी विचारला तर तो जास्तीत जास्त काही हजारापर्यंत जाऊ शकतो असे कोणीही सांगेल... मात्र, नागपुरात एका शौचालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने तब्बल २७ लाखांचा खर्च केला आहे... एवढा खर्च करून अजूनही या शौचालयाचे काम पूर्ण झाले नाही.

Updated: Aug 11, 2017, 09:10 PM IST
एका शौचालयासाठी मनपानं खर्च केले... २७ लाख! title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : एखादे शौचालय बांधण्यास किती रुपयांचा खर्च होऊ शकतो? असा प्रश्न कोणी विचारला तर तो जास्तीत जास्त काही हजारापर्यंत जाऊ शकतो असे कोणीही सांगेल... मात्र, नागपुरात एका शौचालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने तब्बल २७ लाखांचा खर्च केला आहे... एवढा खर्च करून अजूनही या शौचालयाचे काम पूर्ण झाले नाही.

एका शौचालय निर्मितीसाठी नागपूर मनपाने २७ लाख रुपये खर्च केल्याचे आरटीआय अंतर्गत माहिती समोर आली आहे. नागपूरच्या गांधीसागर तलाव हा भोसलेकालीन तलाव... या तलावाचे अनेकदा सुशोभीकरण करण्यात आले. या तलावाशेजारच्या बालउद्यानतलं शौचालयं तब्बल २७ लाखांचं आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेने ही माहिती मिळवली आहे. 

स्वच्छ भारत अभियानाच्या नियमावलीनुसार एक शौचकूप बांधण्यासाठी दीड लाखांचा खर्च येतो. याप्रमाणे या ठिकाणी बांधण्यात आलेल्या ८ शौचकुपांसाठी सुमारे १२ लाखांचा खर्च अपेक्षित होता.  

प्रश्न केवळ शौचालायाचाच नाही तर सुशोभीकरण आणि खाऊ गल्लीच्या नावाखाली महापालिकेने नोव्हेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या तीन महिन्यात सुमारे अडीच कोटींचा खर्च केला आहे. तलावात बसवण्यात आलेलं कारंज भर उन्हाळ्यातही बंद होतं. तर खाऊ गल्ली म्हणून विकसित करण्यात आलेला परिसर अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.