नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या जवानाला भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्या महिलेला आता पोलिसांनी अटक केली आहे.
स्मृती कालरा या अटक केलेल्या ४४ वर्षीय महिलेचे नाव असून ती गुरुग्राममध्ये राहते. दिल्ली पोलिसांनी तिला शुक्रवारी अटक केली आहे. दिल्लीतील वसंत कुंज भागात गेल्या शनिवारी ही मारहाण करतानाची घटना घडली होती.
त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेच्या विरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान १८६, ३५३, ३१४ आणि ३३२ च्यानुसार गुन्हा दाखल करत आज तिला गुरुग्राममधील तिच्या घरातून अटक केली आहे.
स्मृती कालराने भरधाव गाडी चालवत असताना लष्कराच्या ट्रकला ओव्हरटेक केले आणि ट्रकच्यासमोर आपली गाडी थांबविली. ट्रकमधील लष्कराचा जवान खाली उतरला असता संतापलेल्या स्मृतीने थेट त्याच्यावर हात उचलला. समोरच्या गाडीतील एका इसमाने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कैद केला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. यावेळी जवान तिला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, ती त्याला मारहाण करत होती. यानंतर ट्रकमधून अन्य जवान खाली उतरला आणि त्याने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता ही महिला घाईघाईत कारमध्ये बसली आणि निघून गेली.