Science Behind The Shape Of Well : खेडोपाडी गेलं असता तिथं विहिरी सर्रास पाहायला मिळतात. गोड्या पाण्याची, निळ्याशार पाण्याची, कासव आणि इतर जलचरांना सामावून घेणारी आणि अनेकांचीच तहान भागवणारी ही विहीर. जमिनीत कैक फूटांपर्यंतचा खड्डा खणून, त्याला अजुबाजूनं दगडी तटबंदी बांधून ही विहीर तयार केली जाते.
अनेक गावांमध्ये अनेक कुटुंबासाठी विहीर हा मुख्य जलस्त्रोत असतो. डोंगरउतार किंवा भूगर्भात असणाऱ्या पाण्याच्या झऱ्यांचा एकसंध साठा या विहिरीत पाहता येतो. अशा या विहिरीचे अनेक प्रकार सहसा पाहायला मिळतात. कुठं कठडा मोठा असणारी, कुठं जमिनीलाच धरून भूगर्भात खोल असणारी अशी अनेक रुपात ही विहीर पाहता येते.
काही भागांमध्ये या विहीरी आयताकृतीही असतात, पण त्या फारच क्वचित. कारण, सहसा विहीर ही वर्तुळाकारातच खणली आणि बांधली जाते. पण, कधी विचार केला आहे का की ही विहीर त्रिकोण, चौकोन, षटकोन किंवा इतर कोणत्याही आकारात का बरं बांधली जात नाही?
विहिरीचा आकार वर्तुळाकार असण्यामागे एक महतत्वाचं कारण आहे आणि ते कारण म्हणजे विज्ञान. ज्यावेळी एखादा द्रव पदार्थ साठवून ठेवला जातो तेव्हा तो ज्या स्थायूरुपातील वस्तूमध्ये ठेवला जातो त्या वस्तूचाच आकार घेतो. द्रव पदार्थ एखाद्या भांड्यात ठेवला जातो तेव्हा त्यामुळं त्या पदार्थाच्या आजुबाजूच्या भींतींवर दाब तयार होतो.
विहिरीची बांधणी जर चौकोनी आकारात केली, तर त्यामध्ये जमा होणारं पाणी भींतींच्या कोनाड्यांवर सर्वाधिक दाब टाकेल. अशा परिस्थितीमध्ये विहिरीचं आयुर्मान कमी होऊन ती तुटण्याचा धोका अधिक असेल, याच कारणामुळं विहिरी कायम वर्तुळाकारच असतात. ज्यामुळं त्याच्या अंतर्गत भागात असणाऱ्या पाण्याचा समान दाब विहिरीच्या भींतींवर तयार होऊन त्या तुटण्याचा धोका कमी असतो.
विहीरी वर्तुळाकार असण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्यातील माती जास्त दिवस खचत नाही. पाण्याचा समान दाब तयार झाल्यामुळं हे शक्य होतं. आहे की नाही विहीरीच्या आकारामागचं हे कमाल कारण....