Exit Poll vs Opinion Poll in Marathi: लोकसभा निवडणुकीचे 7 टप्पे पार पडले आहेत. आता देशाला निकालाची प्रतिक्षा आहे. प्रत्येक मतदार संघातून खासदार निवडून दिले जातील. जे दिल्लीत मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतील. कोणाचे सरकार बनणार? कोण पंतप्रधान होणार याचे एक्झिट पोल येऊ लागले आहेत. सर्व माध्यमांतून एक्झिट पोलद्वारे कोणते सरकार येऊ शकते याचा अंदाज लावता येतो.
अनेकदा एक्झिट पोल चुकीचे देखील ठरले आहेत. तर अनेकदा एक्झिट पोल अचूकदेखील ठरतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश एक्झिट पोलने मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला होता, जो खरा ठरला. पण एग्झिट पोल म्हणजे नक्की काय? यामध्ये आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक आहे? याबद्दल जाणून घेऊया.
एक्झिट पोल हा निवडणूक सर्व्हे असतो. मतदानाच्या दिवशी न्यूज चॅनल आणि एक्झिट पोल करणाऱ्या एजन्सी मतदान केंद्रावर उपस्थित असतात. मतदान करुन झाल्यावर ते मतदारांना मतदानाविषयी प्रश्न विचारतात. त्यांच्या उत्तराच्या आधारे एक रिपोर्ट तयार केला जातो. मतदारांचे पारडे निवडणुकीत कोणाच्या बाजुने आहे? याचा अंदाज यावरुन लावता येतो. एक्झिट पोल सर्व्हेमध्ये केवळ मतदारांना सहभागी करुन घेतलं जातं.
निवडणूक कार्यक्रमांच्या घोषणेनंतर कोणताच एक्झिट पोल किंवा सर्व्हे जारी केला जाऊ शकत नाही. अंतिम टप्प्याच्या मतदानानंतर संध्याकाळी मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल जाहीर केले जाऊ शकतात.
लोक प्रतिनिधित्ल अधिनियम-1951 च्या कलम 126 ए अंतर्गत अंतिम टप्प्यातील मतदान संपल्याच्या अर्ध्या तासाच्या आत एक्झिट पोल जारी करण्यावर बंदी आहे. याचे उल्लंघन केल्यास कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
भारत निर्वाचन आयोगने पहिल्यांदा 1998 मध्ये एक्झिट पोलची गाइडलाइन्स जारी केली होती. 2010 मध्ये 6 राष्ट्रीय आणि 18 स्थानिक पार्टीच्या समर्थनानंतर कलम 126 ए अंतर्गत मतदाना दरम्यान एक्झिट पोल जाहीर करण्यास बंदी आहे.
एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल दोघांवरही बंदी असावी असे निवडणूक आयोगाला वाटत होते. पण ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल जारी करताना सर्व्हे एजन्सीचे नाव, किती मतदारांना आणि काय प्रश्न विचारण्यात आले? हे स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ओपिनियन पोल हा देखील निवडणूक सर्व्हे असतो. पण तो निवडणुकीच्याआधी केला जाऊ शकतो. यामध्ये सर्व लोकांना सहभागी केले जाते. केवळ मतदारच हवेत असे नाही. विविध मुद्द्यांच्या आधारे प्रभागातील विकास कामे, आश्वासने, आवडी निवडी यावरुन जनतेचा मूड समजून घेतला जातो. जनतेला कोणती योजना आवडते? कोणती नाही आवडतं? याचे अनुमान ओपिनियन पोलमधून लावले जाऊ शकते.