पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर होताच ममता बॅनर्जी असं काही म्हणाल्या की...

नुकसानच जवळपास १ लाख कोटी रुपयांचं झालेलं असताना... 

Updated: May 22, 2020, 04:12 PM IST
पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर होताच ममता बॅनर्जी असं काही म्हणाल्या की...  title=
छाया सौजन्य- एएनआय

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये धडकलेल्या अम्फान चक्रीवादळाची तीव्रता आणि त्यामुळे झालेलं मोठं नुकसान साऱ्या देशाने पाहिलं. याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्याचा दौरा करत हवाई पाहणी करण्याचाही निर्णय़ घेतला. पंतप्रधान हवाई पाहणी करण्यासाठी पोहोचले असता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा तेथे उपस्थित होत्या. 

हवाई दौऱ्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी पश्चिम बंगालसाठी १ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. पण, पंतप्रधानांच्या या मदतीवर बॅनर्जी मात्र काहीशा नाराज असल्याचं त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. नुकसानच जवळपास १ लाख कोटी रुपयांचं झालेलं असताना मोदींनी मदत म्हणून दिलेल्या १ हजार कोटींवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

'मोदींनी आपात्कालीन आर्थिक मदत म्हणून १ हजार कोटी रुपयांची घोषणा केली. पण, हे पैसे कधी आणि कोणत्या स्वरुपात मिळणार याची स्पष्ट माहितीच देण्यात आलेली नाही. आम्ही याविषयी नंतर ठरवू असं ते म्हणाले', असं त्या म्हणाल्या. मोदींना किती निधी द्यायचा आहे ते त्यांचे ते ठरवतील, आम्ही सर्व माहिती त्यांना देणार या शब्दांतच त्या व्यक्त झाल्या. 

 

वाचा : '...तर मराठी चित्रपटांनाच याचा फायदा होईल' 

 

दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या वेळेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये अम्फान या महाचक्रीवादळामुळे ८० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय या वादळामुळे राज्याचं सुमारे 1 लाख कोटी रुपयांचं नुकसान होण्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. आता या साऱ्यामध्ये पंतप्रधानांची मदत कितपत फायद्याची ठरणार आणि ती मदत नेमकी राज्याला कोणत्या स्वरुपात मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.