उना : हिमाचल प्रदेशच्या उनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला संबोधित केलं. हिमाचल प्रदेशमध्ये विरोधी पक्ष नसल्याची खरमरीत टीका त्यांनी काँग्रेसवर केली.
काँग्रेस निवडणुकीचं मैदान सोडून पळून गेल्याचा घणाघातही त्यांनी केला. त्यामुळे हिमाचल प्रदेशची निवडणुक एकतर्फी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी सभेला संबोधित करताना जीएसटी आणि बेनामी संपत्ती सारख्या विषयांवरही भाष्य केलं.
देशाच्या विकासावर चर्चा झाली पाहीजे, असं सांगतानाच देशातील एकाही व्यापारी संघटनेने जीएसटीला विरोध केला नसल्याचा दावा त्यांनी केला. जीएसटीमुळे छोट्या व्यापा-यांसह सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळालाय. अनेक बैठका घेऊन जीएसटीतील त्रुटी दूर करण्यात आल्यात.
आणखी काही त्रुटी येत्या 9 किंवा 10 तारखेला जीएसटी काउंसिलची बैठकीत दूर करू असं त्यांनी सांगितलं. या बैठकीत सर्व समस्यांचं निकारण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर बेनामी संपत्तीवरूनही काँग्रेसला त्यांनी खडे बोल सुनावले.