परीक्षेचा दिवस, काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान; थरुर की खरगे, कोणाला मिळणार कौल?

congress president election : देशभरातील राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसची सूत्र आता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या काळात याच व्यक्तीच्या निर्णयांवर काँग्रेस पुढची वाटचाल करताना दिसणार आहे.   

Updated: Oct 17, 2022, 06:50 AM IST
परीक्षेचा दिवस, काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान; थरुर की खरगे, कोणाला मिळणार कौल? title=
Voting day for Congress president election shashi tharoor and mallikarjun kharge will compete with each other

congress president election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज (सोमवार 17 ऑक्टोबर 2022) मतदान होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरुर (shashi tharoor and mallikarjun kharge) यांच्यात तुल्यबळ लढत पाहता येणार आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या निवडणुकीसाठीचं मतदान सुरु होणार असून, सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अखेरचं मत नोंदवलं जाईल. जवळपास 9 हजारहून अधिक डेलिगेट्स यामध्ये मतदान करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी 36 मतदान केंद्र आणि 67 बूथ तयार करण्यात आले आहे. यामध्ये 6 बूथ एकट्या उत्तर प्रदेशात असतील. एका बूथवर 200 मतं देता येणार आहेत. 19 ऑक्टोबरला या मतांची गणना करण्यात येणार आहे. 

काँग्रेसच्या (Congress) 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अशी निवडणूक लढवण्यात येत आहे. AICC महासचिव, राज्य प्रभारी, संयुक्त सचिव त्यांच्या गृहराज्य कार्यालयांमध्ये किंवा AICC मुख्यालयात मतदान करु शकणार आहेत. 

पक्षातील डेलिगेट्सची निवड कशी होते ?
प्रत्येक ब्लॉकमधून एक डेलिगेट्स निवडला जातो. ब्लॉकमधील बूथचे प्रमुख मतदानाने डेलिगेट्सची निवड करतात. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने साधारणपणे 553 ब्लॉक्स आहेत. त्यातून प्रत्येकी 1 म्हणजे 553 डेलिगेट्सची निवड केलेली आहे.

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि महासचिव प्रियंका गांधी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास 24 अकबर रोड म्हणजेच काँग्रेसच्या मुख्यालयात मतदान करतील. तर, राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि त्यांच्यासोबत 47 कार्यकर्ते कर्नाटकच्या बेल्लारीमध्ये मत देतील. सध्या सुरु असणाऱ्या भारत जोडो यात्रेमुळे ते बेल्लारीतील संगनाकल्लूमध्ये असणाऱ्या केंद्रावर मत नोंदवतील. तर, थरुर आणि खरगे अनुक्रमे तिरुवअनंतपूरम आणि बंगळुरूमध्ये मतदान करतील. 

अधिक वाचा : राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाची निवडणूक कशी होते? कोण करतं मतदान?

 

गांधी कुटुंबीयांचं समर्थन कोणाला? 
मल्लिकार्जुन खरगे यांची गांधी कुटुंबाशी असणारी सलगी आणि ज्येष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर असणारा विश्वास पाहता त्यांनाच गांधी कुटुंबाचंही समर्थन असल्याचं म्हटलं जात आहे. तर, शशी थरुर यांनी आपण बदलांचे जनक असल्याचं म्हणत नवा दृष्टीकोन सर्वांपुढे मांडला आहे. पण, गांधी कुटुंब मात्र तटस्थ असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. गांधी कुटुंबाचं पक्षात एक महत्त्वाचं स्थान आहे, असं खरगेंचं मत; तर, कोणीही गांधी कुटुंबापासून दूर राहून पक्षासाठी काम करु शकत नाही असं थरुर यांचं म्हणणं.