आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यातही सध्या प्रत्येकजण आपल्या पाल्याला इंग्लिश मीडिअममध्ये शिकवण्यास प्राधान्य देत असतो. यासाठी अनेकदा डोनेशनच्या नावे पालकांकडून मोठी रक्कम घेतली जाते. त्यात नंतर शाळेची फी भरताना पालकांचीही दमछाक होते. काही शाळांमध्ये तर ही फी लाखोंमध्ये असते, ज्यामुळे पालकांना नेमकं काय करावं असा प्रश्न पडतो. याचीच प्रचिती देणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यानंतर अनेकजण त्यावर व्यक्त होत असून, भारतात चांगलं शिक्षण घेणं आता फक्त श्रीमंतांना शक्य असल्याची खंत व्यक्त करत आहेत.
ऋषभ जैन नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यानिमित्ताने भारतातील शिक्षणाच्या वाढत्या खर्चावर, विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी निर्माण होणारी आव्हानं यावर वाद-विवाद सुरु झाला आहे. ऋषभ जैनने एका नामांकित शाळेची फी रचना शेअर केला आहे. यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यासाठी 4 लाखांपेक्षा अधिक फी असल्याचा खुलासा झाला आहे.
फक्त पहिलीच्या विद्यार्थ्यासाठी तब्बल इतकी फी असल्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. भारतातील शिक्षणाचा वाढता खर्च यावर अनेकजण चिंता व्यक्त करत आहेत.
Good education is a luxury - which middle class can not afford
My daughter will start Grade 1 next year, and this is the fee structure of one of the schools we are considering in our city. Note that other good schools also have similar fees.
- Registration Charges: ₹2,000
-… pic.twitter.com/TvLql7mhOZ— RJ - Rishabh Jain (@rishsamjain) November 17, 2024
ऋषभ जैन स्वत: एक पालक असून पोस्टच्या माध्यमातून आपली चिंता व्यक्त केली आहे. पोस्टमध्ये त्याने एका मोठ्या शहरातील नामांकित शाळेचं फी स्ट्रक्चर शेअर केलं आहे ज्यामध्ये वार्षिक फी 4 लाख असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये नोंदणी शुल्क, प्रवेश शुल्क, देखभाल शुल्क, वार्षिक शाळेचे शुल्क, बस शुल्क, पुस्तके आणि गणवेशाचा खर्च समाविष्ट आहे.
ऋषभ जैनच्या पोस्टवर अनेक पालक व्यक्त झाले आहेत. यामध्ये त्यांनी भारतातील शिक्षणाच्या वाढत्या खर्चावर नाराजी जाहीर केली आहे. जर अशाच प्रकारे शिक्षण महागत राहिलं तर मध्यवर्गीय कुटुंबाना के कसं परवडणार अशी विचारणा पालकांकडून केली जात आहे.
दरम्यान एका युजरने म्हटलं आहे की, "12 वर्षांचे 1 ते 1.2 कोटी होत आहेत. हे खूपच जास्त आहे. मध्यमवर्गीयांना ही फी परवडणारी नाही. ही एक गंभीर समस्या आहे आणि यावर नियंत्रण कसे ठेवता येईल यावर विचारमंथन करणे आवश्यक आहे अन्यथा मुलांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरेल".
"दर्जदार, गुणवत्ता असणारं शिक्षण कधीही लक्झरी नसावे. हा मूलभूत अधिकार असावा, विशेषत: गरजूंसाठी," अशी कमेंट एका युजरने केली आहे.
"भारतातील दर्जेदार शिक्षणाची ही किंमत आहे. तुम्ही वर्षाला 20 लाख कमावले तरी ते परवडेल का? नाही!!!," अशी खंत जैन यांनी व्यक्त केली आहे. उच्च कर आणि इतर खर्चाचा डिस्पोजेबल उत्पन्नावर होणारा परिणाम अधोरेखित केला, ज्यामुळे पालकांना शिक्षणाच्या वाढत्या खर्चाची पूर्तता करणे कठीण होते.
सर्वांसाठी परवडणारे आणि दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करण्याच्या सरकारी आणि खासगी संस्थांच्या भूमिकेवर या पोस्टने प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्याची व्यवस्था श्रीमंतांना अनुकूल आहे, तर बहुसंख्य भारतीय कुटुंबे आपल्या मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी धडपडत आहेत. अनेकांनी शाळेच्या फीबद्दल जैन यांनी व्यक्त केलेल्या संतापाचं समर्थन केले, तर काही लोकांनी ही अतिशयोक्ती असल्याचं म्हटलं.
"तुम्ही फक्त स्टेटस सिम्बॉल पाहत आहात! फक्त 1 टक्के शाळा एवढी फी आकारतात. याचा अर्थ असा नाही की फक्त 1 टक्के शाळाच दर्जेदार शिक्षण देतात," असं एका युजरने म्हटलं आहे.
"भाऊ तुम्ही अतिशयोक्ती करत आहात असे वाटते! आणि हे ट्विट करण्यासाठी तुम्ही तुमच्या शहरातील सर्वात महागडी शाळा निवडली आहे! होय आमच्या देशात गुणवत्ता शिक्षण हा एक विनोद आणि उपकार आहे या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत नाही. सरकार शिक्षणासाठी जो सेस करतं तो राजकारण्यांकडे जातो," असं एकाने म्हटलं आहे.