लखनऊ : उत्तर प्रदेशमधलं योगी आदित्यनाथ सरकार सार्वजनिक ठिकाणी असणारे लाऊडस्पीकर काढून टाकणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशातल्या ध्वनी प्रदुषणामुळे न्यायालयानं नाराजी व्यक्त केली होती. तसंच मंदिर, मशिद आणि गुरुद्वारांसारख्या धार्मिक स्थळांवरचे लाऊडस्पीकर परवानगी घेऊन लावण्यात आले का? असा सवाल न्यायालयानं विचारला होता. न्यायालयानं खडसावल्यानंतर अवैधरित्या लावण्यात आलेले लाऊडस्पीकर हटवण्याचा निर्णय योगी सरकारनं घेतला आहे.
ऑडिटोरियम, कॉन्फरन्स रूम आणि कम्यूनिटी हॉल यांच्यासारखी ठिकाणं सोडून रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण वर्षातल्या १५ दिवसांसाठी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमानिमित्त रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या अटींवर लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी देण्यात येणार आहे.