Crime News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये (Hapur) एका गर्भवती अल्पवयीन मुलीला आई आणि भावाने पेटवून दिलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी कुटुंबियांनी तिला पेटवण्याआधी तिचा गळ्यावर वार केले होते. जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना हा सगळा प्रकार कळवला. पोलिसांनी (UP Police) घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात एका मुलीला तिच्या कुटुंबीयांनी पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ती तरुणी गर्भवती होती. मात्र तिचे लग्न झालेलं नव्हतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना नवादा खुर्द गावात घडली. 70 टक्क्यांहून अधिक भाजलेल्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
हापूरच्या बहादूरगढ भागातील नवादा खुर्द गावात गुरुवारी संध्याकाळी हा सगळा प्रकार घडला. अल्पवयीन बहीण गरोदर असल्याचे कळताच मोठ्या भावाने आईसह मिळून आधी तिचा ब्लेडने गळा चिरला. त्यानंतर तिला जिवंत जाळण्यासाठी तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. तरुणीचा आरडाओरडा ऐकून स्थानिक तिथे पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत
आई आणि मुलाला ताब्यात घेतले आणि गंभीररीत्या भाजलेल्या मुलीला रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे त्याच गावातील एका तरुणासोबत शारीरिक संबंध होते आणि ती गर्भवती राहिली. हा प्रकार तिच्या घरच्यांना कळताच ते संतापले.
अल्पवयीन मुलगी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. त्यामुळे तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. पण काहीच फरक पडत नसल्याने तिच्या आईने आणि भावाने तिला एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखवले. वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलगी गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबियांना दिली. मुलगी गरोदर असल्याची माहिती मिळताच कुटुंबाला धक्का बसला. त्यानंतर संतापलेल्या भाऊ आणि आईने मुलीच्या हत्येचा कट रचला.
भाऊ आणि आई मुलीला बाईकवरुन घरी निघाले होते. त्यांनी वाटेत जंगलात एका ठिकाणी बाईक थांबवली. त्यानंतर आरोपी भावाने पिशवीतल्या ब्लेडने बहिणीच्या गळ्यावर वार केले. त्यावेळी आरोपी आईने मुलीचे पाय धरले. तितक्यात भावाने बाईकमधून पेट्रोल काढून तिला पेटवून दिलं. आजूबाजूच्या लोकांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि तिथे पोहोचले. त्यांनी पोलिसांना बोलवून सगळा घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी मुलीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवून दिलं.