'BJP पदाधिकाऱ्याच्या ट्रकमध्ये 300 EVM; हे EVM हटवल्यास..'; राऊतांची खोचक टीका

Raut Slams BJP Over EVM Issue: “इव्हीएम बनवणाऱ्या (भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड) सरकारी कंपनीवर भाजपाचे 4 संचालक नियुक्त केले आहेत," असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 31, 2024, 11:31 AM IST
'BJP पदाधिकाऱ्याच्या ट्रकमध्ये 300 EVM; हे EVM हटवल्यास..'; राऊतांची खोचक टीका title=
पत्रकारांसमोर बोलताना साधला निशाणा

Raut Slams BJP Over EVM Issue: लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असतानाच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 'ईव्हीएम है तो मोदी है' असा टोला राऊत यांनी लगावला आहे. 2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून नियोजन केलं जातं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पलटूराम असा उल्लेख करत राऊत यांनी टीका केली आहे. लोकशाहीमध्ये भाजपा चंदीगढ पॅटर्न आणण्याचा प्रयत्न करत असल्याचंही राऊत म्हणाले.

लोकांमध्ये जायची हिंमत नाही

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ईव्हीएम व चंदीगडमधील घडामोडींचा संदर्भ देत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. भारतीय जनता पार्टी हा एक डरपोक पक्ष असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. “भाजपा हा डरपोक पक्ष आहे. लोकांमध्ये जायची त्यांच्यात हिंमत नाही. इव्हीएम किंवा चंदीगड पॅटर्न नसेल, तर भाजपा जिंकू शकत नाही” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.

ट्रकमध्ये सापडल्या 300 इव्हीएम

“उत्तर प्रदेशच्या चंदौलमधील एका दुकानात 200 इव्हीएम मशीन सापडल्या आहेत. तो भाजपाचा पदाधिकारी आहे. आसाममध्ये एका ट्रकमध्ये 300 हून जास्त इव्हीएम मशीन सापडल्या. तो ट्रकही भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. हा काय खेळ आहे?” असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

इव्हीएमवरही प्रश्नचिन्ह

इव्हीएमच्या विश्वासार्हतेवरही संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “इव्हीएम बनवणाऱ्या (भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड) सरकारी कंपनीवर भाजपाचे 4 संचालक नियुक्त केले आहेत. इव्हीएममधला गुप्त कोड तिथेच तयार केला जातो. पण संचालकांपैकी बहुतेक संचालक गुजरातचे आहेत. 2024 मध्ये कशाप्रकारे निवडणुका लढवल्या जातील, त्याचीच ही पूर्व तयारी आहे," असं संजय राऊत म्हणाले. 

भाजपाचे 2 पॅटर्न

आता मनसुखभाई किंवा चंदीगड पॅटर्ननेच भाजपा निवडणुका लढवणार असा टोलाही राऊत यांनी लगावला. "भाजपाचे 2 पॅटर्न आहेत. एक मनसुखभाई पॅटर्न. मनसुखभाई हे इव्हीएम बनवणाऱ्या कंपनीचे संचालक झाले आहेत. दुसरा चंदीगड फॉर्म्युला आहे. तिथे काँग्रेस व आपनं निवडणूक जिंकली पण तरीही भाजपा हे मानायला तयार नाही. मतपत्रिकांचं अपहरण करुन ते गादीवर आले,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

रामभक्तांनीच लोकशाहीरुपी सीतेचं अपहरण केलं

संजय राऊतांनी चंदीगडमधील राजकीय घडामोडींचा दाखला देताना. “भाजपा सरळ लोकशाहीच्या मार्गानं कोणतीही निवडणूक या देशात जिंकू शकत नाही. ईव्हीएम हटवल्यास भाजपा गेली. इव्हीएम है तो मोदी है. चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत होतं. दोघांच्या मिळून 20 जागा होत्या. भाजपाकडे 14 जागा होत्या. मतदान आप व काँग्रेसच्या बाजूने झालं. पण त्यानंतर पीठासीन व्यक्तीनं आप आणि काँग्रेसच्या बाजूची 8 मतं बाद केली. विजयी होत असलेल्या काँग्रेस-आप युतीच्या महापौराला पराभूत दाखवून भाजपाचा महापौर विजयी ठरवला. हा चंदीगड पॅटर्न भाजपानं आणला आहे,” असं राऊत म्हणाले. पुढे बोलताना, “सीतेचं अपहरण रावणानं केलं, असं आम्ही वाचलं होतं. मात्र चंदीगडमध्ये लोकशाहीरुपी सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं”, असा टोलाही राऊतांनी लगावला.