Ladakh News : समुद्रसपाटीपासून कैक हजार फूट उंचीवर असणाऱ्या आणि पर्यटकांसाठी कोणत्याही ऋतूमध्ये नवं रुप समोर आणणाऱ्या लडाखविषयी कायमच अनेकांना अप्रूप वाटतं. नैसर्गिक सौंदर्य, याच निसर्गाचं रौद्र ते अगदी निर्मळ रुप दाखवणाऱ्या या भागात आजवर असंख्य पर्यटकांनी भेट दिली. पण, आजही लडाखमधील काही गावं अशी आहेत जी मुख्य प्रवाहापासून दूर आपल्याच अनोख्या विश्वात रममाण आहेत.
आधुनिक जगाशी त्यांचा थेट संबंध नाही. असं असूनही ही गावं आकर्षणाचा केंद्रबिंदू मात्र आहेत हे नाकारता येत नाही. जगभरातील प्रवासवेडी मंडळी आणि ट्रेकर्ससाठी महत्त्वाच्या अशा या लडाखमध्ये एक गाव असंही आहे, जिथं चक्क परदेशी महिलांचा अधिक वावर पाहायला मिळतो. इथं या महिला इथं एका खास कारणासाठी येतात. हे कारण असतं ते म्हणजे गर्भधारणेचं.
लडाखच्या कारगिल क्षेत्रापासून साधारण 70 किमी अंतरावर असणाऱ्या एका गावाकडे या परदेशी महिलांचा सर्वाधिक ओघ असतो. हे गाव या क्षेत्रात आर्यन व्हॅली किंवा आर्य व्हॅली म्हणून ओळखलं जातं. लडाखच्या पर्वतांनी वेढलेल्या या भागात युरोपीय महिलांचा सर्वाधिक वावर पाहायला मिळतो, त्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासामागे एक खास कारण असतं आणि ते कारण म्हणजे येथील पुरुषांपासून होणारी गर्भधारणा. ऐकिवात ही माहिती काहीशी अनपेक्षित असली तरीही जागतिक स्तरावरही अनेक माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
विविध संदर्भांमध्ये उल्लेख असल्यानुसार सिकंदराच्या सैन्यातील जवामनांप्रमाणं चांगली शरीरयष्टी, भक्कम बांधा आणि निरोगी देहबोली अशा गर्भधारणेसाठी परदेशी महिला या गावाची वाट धरतात आणि गर्भधारणेनंतर त्या इथून आपल्या देशी परततात. सुरुवातीच्या काळात या कोणालाच या समुदायाविषयी फार माहिती नव्हती. पण, इंटरनेटच्या उपलब्धतेमुळं या गावाची चर्चा संपूर्ण जगात झाली आणि परदेशी महिलांचं इथं येण्याचं प्रमाण वाढलं. इथं याच कारणास्तव पर्यटनाला वाव मिळत असून स्थानिकांना आर्थिक मदत देऊ केली जाते असंही सांगण्यात येतं.
लडाखच्या आर्यन व्हॅलीमध्ये ब्रोक्पा समुदायाचं अस्तित्व असून ही मंडळी अलेक्झांडर द ग्रेट (जगज्जेता सिकंदर) याच्या लष्कराचे वंशज म्हणवले जातात. इतकंच नव्हे, तर येथील स्थानिकांच्या मते ते जगातील ज्ञात असे सर्वात शुद्ध आर्य वंशीय आहेत. असं म्हणतात की सिकंदर जेव्हा भारतातून पुढे जात होता तेव्हा त्याच्या सैन्यातील काही तुकड्या इथंच थांबल्या आणि हा समुदाय म्हणजे त्यांचेच वंशज.
लडाखमधील या समुदायाची अंगकाठी आणि चेहरेपट्टी इतरांहून काहीशी वेगळी असून, त्यांची भाषा आणि संस्कृतीसुद्धा वेगळी आहे. या संस्कृतीत त्यांच्या सणवारांची लेखी नोंद ठेवण्यात आली नसून, ही सर्व माहिती मौखिक स्वरुपात पुढील पिढीकडे सुपूर्द केली जाते. ब्रोकस्केट ही येथील स्थानिकांची भाषा, जी प्रत्यक्षात इंडो आर्यन श्रेणीत येते. या समुदायाचे अनेक सणवार पंचांगानुसार सूर्यावर आधारित असतात असं सांगितलं जातं.