Corona News : चीनमध्ये कोरोनानं हाहाकार माजवला आणि इथं भारतातही 2020 मध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्यामुळं आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. केंद्र सरकारनं देशात पहिल्यांदा Lockdown लागू केला. या घटनेला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. पहिल्या लॉकडाऊनच्या आठवणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि सोबतच एक चिंता वाढवणारं वृत्तही समोर आलं. हे वृत्त म्हणजे देशात कोरोना रुग्णांची पुन्हा वाढणारी संख्या.
मागील काही दिवसांपासून देशभरात पुन्हा एकदा कोरोना रूग्णसंख्या मोठ्या फरकानं वाढताना दिसत आहे. सदरील परिस्थिती पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी अनेक राज्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर 10- 11 एप्रिलला रूग्णालयात मॉक ड्रील करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
सोमवारी सायंकाळी 4 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ही बैठक होणार आहे. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रूग्णसंख्या तिपटीने वाढली आहे. परिणामी देशातील यंत्रणा आतापासूनच सावधगिरीची पावलं उचलताना दिसत आहेत. खुदद् पंतप्रधान मोदींनी दोन दिवसांपूर्वीच फ्लूचे वाढते रूग्ण आणि कोरोना यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. ज्यानंतर आता ज्या राज्यात कोरोना रूग्णसंख्येचा आलेख उंचावतोय तेथील प्रशासकीय अझिकाऱ्यांना आरोग्य मंत्रालयातर्फे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केलं जाणार आहे. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांची तयारी, त्यांना लागणारी अतिरिक्त मदत याचा आढावा घेतला जाईल.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं अनेकांचीच चिंता वाढवली आहे. परिणामी पुन्हा एकदा कोरोनापासून दूर राहण्यासाठी बूस्टर डोस घेण्याला प्राधान्य दिलं जात आहे. ज्या नागरिकांनी कोरोनाचा Booster Dose घेतलेला नाही त्यांना, तो घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सध्याचा कोरोनाचा धोका लसीमुळं थोपवून धरता येऊ शकतो असं सांगत नागरिकांना हे आवाहन केलं जात आहे.
मुंबईसारख्या मोठ्या आणि गर्दीच्या शहरात अनेक नागरिकांनी अजूनही बूस्टर डोस घेतलेला नाही. त्यामुळे अँटिबॉडिज कमी झाल्याचं निदर्शनास आलं आहे. ज्यामुळं बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. जिनोम सिक्वेन्सिंगनुसार राज्यात 105 सँपल्स ही नव्या XBB 1.16 या व्हेरियंटचे आढळले आहेत. कोरोना विषाणूत सातत्यानं होणारी बदल पाहता बूस्टर त्याची तीव्रता कमी करतो हे लक्षात घेणं महत्त्वाचं.