नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. रात्री आठ वाजता त्यांचे भाषण ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारित होईल. यावेळी मोदी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढणे आणि विभाजनाविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी कलम ३७० रद्द करणारे विधेयक राज्यसभेत मांडले होते. यानंतर संसदेत एकच गदारोळ पाहायला मिळाला होता. मात्र, सरतेशेवटी हे विधेयक राज्यसभेत बहुमताने मंजूर झाले होते. त्यानंतर लोकसभेतही सरकारने हे विधेयक मंजूर करवून घेण्याची औपचारिकता पूर्ण केली होती.
Prime Minister Shri @narendramodi will be addressing the nation at 8 PM today.
— PMO India (@PMOIndia) August 8, 2019
दरम्यान, कलम ३७० रद्द झाल्यानंतर मोदींनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना संयमाने वागण्याच्या सूचना दिल्याचेही समजते. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर आपण कशावर तरी विजय मिळवला आहे, असा संदेश समाजात जाता कामा नये. तर आपण ऐतिहासिक चूक सुधारली, हे लोकांना समजले पाहिजे. त्यामुळे येथून पुढच्या काळात आपल्याला मोठी जबाबदारी उचलावी लागणार आहे, असे मोदींनी मंत्र्यांना बजावले होते.
काश्मीरच्या नागरिकांसोबत जेवण करताना NSA अजित डोवाल यांचा व्हिडिओ व्हायरल
त्यामुळेच भाजपने अनुच्छेद ३७० रद्द केल्याचा जाहीर उत्सव करणे टाळले आहे. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतरही भाजपकडून याबाबत दक्षता बाळगण्यात आली. काश्मीर मुद्द्यावरून आनंद साजरा करणे भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाला आवडणार नाही, असे स्पष्ट निर्देशही भाजपच्या नेत्यांना देण्यात आले होते.