कर्नाटकमधील काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीला चार आमदारांची दांडी; राजकारणाला पुन्हा रंगत

काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना ईगल्टन रिसॉर्टमध्ये हलवले आहे.

Updated: Jan 18, 2019, 08:10 PM IST
कर्नाटकमधील काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीला चार आमदारांची  दांडी; राजकारणाला पुन्हा रंगत title=

बंगळुरु: कर्नाटकमध्ये शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ बैठकीला चार आमदारांनी दांडी मारल्याने येथील राजकारणाला पुन्हा रंगत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून काँग्रेस व संयुक्त जनता दलाचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री कुमारस्वामी एचडी कुमारस्वामी यांनी सर्व आमदार आमच्याबरोबर असल्याचा दावा केला होता. यानंतर काँग्रेस व जेडीएसकडून शुक्रवारी आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु, या बैठकीला काँग्रेसच्या चार आमदारांनी दांडी मारल्याने नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींनंतर काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना ईगल्टन रिसॉर्टमध्ये हलवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रमेश जारकिहोली, बी. नागेंद्र, उमेश जाधव आणि महेश कुमाठल्ली हे चार आमदार आजच्या बैठकीला अनुपस्थित होते. 

यावरून काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी भाजपवर जोरदार टीका केली. कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अनेक केंद्रीय मंत्री जातीने प्रयत्न करत आहेत. भाजपकडून आमच्या आमदारांना ५० ते ७० कोटींची ऑफर देण्यात आली आहे. आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. देशाच्या चौकीदाराकडे इतके पैसे कुठून आले, असा सवाल सिद्धरामय्या यांनी विचारला. दरम्यान, बैठकीला गैरहजर असणाऱ्या चार आमदारांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. या सर्व आमदारांवर पक्षद्रोही विरोधी कायद्यातंर्गत कारवाई केली जाईल, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांत राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झालीय. सध्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांपैकी भाजपचे १०४, काँग्रेसचे ८० तर जेडीएसचे ३७ आमदार आहेत. बसपा, केपीजेपी आणि अपक्ष असे प्रत्येकी एक आमदार आहे.