'तू ये, घराचा दरवाजा उघडाच ठेवला आहे', सीमा हैदर आणि व्हायरल मिथिलेश भाभीमध्ये जोरदार राडा

व्हायरल भाभी मिथिलेश भाटीने सीमा आणि सचिन यांच्यावर आरोप लावला आहे की, ते धमक्या देत असून आमच्या मागे गुंड लावले आहेत. पण सीमा हैदर आणि सचिन यांनी आरोप फेटाळले असून, पोलिसात तक्रार दाखल करुन चौकशी करु शकता असं ते म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Aug 22, 2023, 11:51 AM IST
'तू ये, घराचा दरवाजा उघडाच ठेवला आहे', सीमा हैदर आणि व्हायरल मिथिलेश भाभीमध्ये जोरदार राडा

पाकिस्तानातून भारतात दाखल झालेली सीमा हैदर आणि तिचा भारतीय प्रियकर सचिन काही ना काही कारणाने चर्चेत असतात. कधी आपले व्हिडीओ तर कधी चित्रपटाची ऑफर यामुळे सीमा हैदर आणि सचिनची चर्चा सुरु असते. पण या प्रसिद्धीसह त्यांच्या मागे अनेक वादही उभे राहिले आहेत. सध्या सीमा हैदर आणि सचिन यांच्यात व्हायरल मिथिलेश भाटीसह शाब्दिक वाद सुरु असून, तो वाढत चालला आहे. सचिनला लप्पू, झिंगूर म्हणणाऱ्या मिथिलेश भाटीला सीमा-सचिनने कोर्टाकडून नोटीस पाठवली आहे. पण मिथिलेशने आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान मिथिलेश भाटीने सीमा आणि सचिन यांच्यावर आरोप लावला आहे की, ते धमक्या देत असून आमच्या मागे गुंड लावले आहेत. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

एका वृत्तवाहिनीतील चर्चेत सचिन-सीमा आणि मिथिलेश भाटी आमने-सामने आले होते. यावेळी त्यांच्यात जोरदार वाद झाला. मिथिलेश भाटीने सचिनच्या काकांना मला धमकी दिली असून, मागे गुंड लावल्याचा आरोप केला आहे. माझ्या घऱावर पाळत ठेवली जात असल्याचाही तिचा दावा आहे. 

सचिन-सीमाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तिच्याकडे कोणतेही पुरावे नसून, बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असा दावा त्यांनी केला आहे. आपण पोलिसांच्या नजरकैदेत असून, सतत पोलिसांची नजर आपल्यावर असते असं सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावले. 

नोटीस पाठवण्यासंबंधी सीमाने सांगितलं की, "मिथिलेश भाटी सतत आमच्याबद्दल उलट सुलट बोलत आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या जात आहेत. मिथिलेश भाटीचं म्हणणं आहे की, तिने जाणुनबुजून सचिनला लप्पू, झिंगुर म्हटलेलं नाही. हे तर गावात सामान्यपणे बोललं जातं. पण ती मुद्दामून गेल्या दीड महिन्यांपासून सचिनबद्दल आक्षेपार्ह विधानं करत आहे. ही कोणत्याही गावाची भाषा नाही इतकं तर मला माहिती आहे. जर कोणी माझ्या पतीबद्दल असं बोलणार असेल तर मला ते रुचणार नाही".

मला कोणतीही नोटीस मिळालेली नाही - मिथिलेश

यावर मिथिलेश भाटीने म्हटलं की, भावना तर आमच्याही दुखावल्या आहेत. माझ्या पतीला अशाप्रकारे ट्रोलं केलं जात आहे. मी मुद्दामून काहीच बोलली नाही. दरम्यान सीमाबद्दल बोलताना तिने म्हटलं की, "मी तर अशिक्षित आहे. पण तरीही आपल्या पतीप्रती इमानदार आहे. मी सीमाप्रमाणे आपल्या पतीला सोडून दुसऱ्या कोणाकडेही गेली नाही. जर सीमाचं सचिनवर प्रेम आहे तर मग गुलामवर नाही का? त्याच्याशीही प्रेमविवाहच केला होता".

"माझ्या घराचा दरवाजा उघडा आहे"

 सीमाने म्हटलं की "मिथिलेश भाटी वारंवार धमकी देत मी सीमाला पाहून घेईन असं म्हणत आहे. जर तिला मला पाहण्याची इतकी आवड असेल तर माझ्या घराचे दरवाजे उघडे आहेत. ती आमच्या घरात येऊ शकते. नंतर जे होईल ते ती पाहू शकते. आमच्या खासगी आयुष्यावर बोलणारी ती कोण आहे? तिला आमचा काय त्रास होत आहे? युपी एटीएस आणि पोलीस तपास करत असताना ती कशाला मध्ये पाय घालत आहे?". 

सीमा हैदर आणि सचिन यांनी आरोप फेटाळले असून, पोलिसात तक्रार दाखल करुन चौकशी करु शकता असं ते म्हणाले आहेत. "मिथिलेशवर आम्ही जीवघेणा हल्ला केला नसून, आम्हाला त्याची काही माहिती नाही. आम्ही ना तिला धमकी दिली आहे, ना गुंड पाठवले आहेत. ते पोलिसांत जाऊ शकतात. आम्ही चौकशीत सहकार्य करु," असं ते म्हणाले आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x