Priyadarshini Indalkar : महाराष्ट्रातील लग्नसराई आणि पारंपरिक रितींची अनोखी गोष्ट सांगणारा 'रुखवत' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील नवीन गाणं 'ऋतु प्रेमवेडा' हे नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. सोनू निगम आणि बेला शेंडे यांच्या गोड आणि भावस्पर्शी आवाजाने सजलेल्या या गाण्याने मराठी संगीतविश्वात उत्साह निर्माण केला आहे. बऱ्याच दिवसांनी असं काही वेगळं आणि त्यातही अनपेक्षित अशी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. तर यातून आता प्रेक्षकांना हे गाणं ऐकताना एक अनोखा अनुभव मिळणार आहे.
हे गाणं प्रेम, विरह, आणि ऋतूंच्या बदलत्या छटांची सुंदर अनुभूती देते. हे गाणं प्रत्येक संगीतप्रेमीच्या हृदयाला भिडेल. 15 नोव्हेंबर 2024 रोजी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. लग्नसराईतील 'रुखवत' परंपरेचं आकर्षण आणि गूढता मांडणाऱ्या या पोस्टरनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय प्रेक्षकांना 'ऋतु प्रेमवेडा' गाण्याच्या माध्यमातून परंपरा आणि गूढता यांची अनोखी सांगड पाहायला मिळेल. इतकंच नाही तर पोस्टर लाँच दरम्यान, या चित्रपटाच्या कथेची गोडी आणि आकर्षण स्पष्टपणे दिसून आली आणि प्रेक्षकांच्या मनात 'रुखवत' परंपरेबद्दल नवा उत्साह निर्माण झाला.
हेही वाचा : दीपिकानंतर आता 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्रीच्या मुलीच्या नावाची चर्चा, पण अर्थ काय?
या चित्रपटाची निर्मिती ब्रिंदा अग्रवाल यांनी केली असून उद्योजक म्हणून, त्यांनी नेहमीच मनोरंजन आणि संस्कृतीच्या क्षेत्रात नवकल्पकतेला प्रोत्साहन दिले आहे. त्यांचा दृषटिकोन आणि ते जे काही नवीन प्रोजेक्ट्स घेऊन नेहमीच सगळ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. दिग्दर्शक विक्रम प्रधान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे दर्शकांना वेगवेगळ्या अनोख्या अनुभव अनुभवण्याची संधी दिली आहे. 'रुखवत' मध्ये त्यांनी सांस्कृतिक धारा आणि थ्रिलर कथानक यांचे सुंदर मिश्रण लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या चित्रपटात प्रियदर्शनी इंदलकर आणि संतोष जुवेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गौरव चाटी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर विक्रांत हिरनाईक यांनी हे गाणं कंपोज केलं आहे. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट ग्रुप द्वारे प्रस्तुत आणि रब्री प्रोडक्शन निर्मित हा चित्रपट 13 डिसेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.