एम्ब्रॉयडरी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; तपासात धक्कादायक माहिती उघड, समलैंगिक मित्राने आधी...

सूरतमधील एका एम्ब्रॉयडरी फॅक्टरीत काही दिवसांपूर्वी मशीनमध्ये अडकून एका मजुराचा मृत्यू झाला होता. मृतदेहाचं शवविच्छेदन केलं असता, त्याच्या समलैंगिक मित्रानेच हत्या केल्याच उघड झालं.   

शिवराज यादव | Updated: Feb 20, 2025, 02:28 PM IST
एम्ब्रॉयडरी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; तपासात धक्कादायक माहिती उघड, समलैंगिक मित्राने आधी...

गुजरातच्या सूरत शहरमधील कतारगजाम जीआयडीसी परिसरात असणाऱ्या एका एम्ब्रॉयडरी फॅक्टरीत काही दिवसांपूर्वी एका मजुराचा एम्ब्रॉयडरी मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला होता. मजूर मशीनमध्ये अडकल्याची माहिती मिळताच सूरत पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले होते. मजुराला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

शवविच्छेदनात उघड झाली हत्या

सुरुवातीला 24 वर्षीय परवेज आलम कुदुस अंसारीचा अपघाती मृत्यू झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न झाला. पण पोलीस तपासात आणि शवविच्छेदन अहवालात ही हत्या असल्याचं उघड झालं. पोलिसांनी हत्या प्रकरणी मृत मजुराचा 31 वर्षीय मित्र रजबअली जाफिरुद्दीन अंसारीला अटक केली. 

मशीनच्या पेंटागनमध्ये अडकला होता मृतदेह

सूरत शहराच्या कतारगाम जुन्या जीआयडीसी परिसरातील विश्वकर्मा सोसायटीत स्थित एम्ब्रॉयडरी कंपनीत 24 वर्षीय परवेज आलम अन्सारी काम करत होता. 8 फेब्रुवारी 2025 च्या रात्री तो कारखान्यात एकटा काम करत होता. सकाळी जेव्हा इतर कारागीर फॅक्टरीत पोहोचले तेव्हा परवेज मशीनच्या पेंटागनमध्ये अडकलेला होता. कारखानच्या ग्रीलचा दरवाजा आतून बंद  होता. कारागीरांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी  मशून कट करुन आत अडकलेल्या परवेजला बाहेर काढलं. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

मित्राकडे सापडला मोबाईल

मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असता गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. परवेज अंसारीच्या भावानेही हत्या झाल्याची शंका व्यक्त केली. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर सर्वात आधी मृत तरुणासोबत राहणाऱ्या रजबअली अंसारीची चौकशी केली. यावेळी मृत तरुणाचा मोबाईल त्याच्याजवळ सापडला. त्याने मोबाईल स्विच ऑफ केला होता. मोबाईलची बॅटरी संपल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. पण जेव्हा पोलिसांनी मोबाईल स्विच ऑन केला असता 60 टक्के बॅटरी असल्याचं स्पष्ट झालं. येथून पोलिसांना शंका येण्यास सुरुवात झाली. 

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता 8 तारखेला रजबअली अंसारी फॅक्टरीच्या आत आणि बाहेर जाताना दिसला. पोलिसांचा संशय खरा ठरला. कसून चौकशी करण्यात आली असता त्याने गुन्हा कबूल केला. 

सूरत पोलिसांचे डीसीपी भगीरथ गढवी यांनी सांगितलं की, कतारगाम पोलीस स्थानकात अनैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणाची नोंद झाली आहे. रजबअलीने पोलिसांना सांगितलं की, आपणच ही हत्या केली आहे. त्याने सांगितलं की, त्याचे आणि परवेजचे समलैंगिक हत्या केली. परवेजने आपल्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. हे फोटो डिलीट करण्यासाठी रजबअली त्याला वारंवार विनंती करत होता, पण तो तयार होत नव्हता. यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने हत्या करण्याचा निर्णय घेतला. 

हत्या केल्यानंतर मोबाईलमधील व्हिडीओ, फोटो डिलीट करण्याचा त्याने प्रयत्न केला. पण त्याला ते शक्य झालं नाही. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.