नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय राहिला आहे. याबाबत शुक्रवारी संसदेत नवीन माहिती पुढे आली. या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षांच्या काळात ८४ परदेश दौरे केले आहेत. या दौऱ्यांवर एकूण २०११ कोटी रुपये इतका खर्च झाल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी दिली. यामध्ये एअर इंडियाच्या विमानाची देखभाल आणि सुरक्षित हॉटलाईनवर करण्यात आलेला खर्चाचा समावेश आहे. एकूण खर्चापैकी १०८८.४२ कोटी विमानासाठी, तर चार्टर्ड विमानांसाठी ३८७.२६ कोटी आणि हॉटलाईनसाठी ९.१२ कोटी रुपये खर्च झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली. तेव्हापासून त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. तर व्यापार आणि सामरिक कारणांसाठी अमेरिका, चीन आणि जपानमध्ये त्यांनी एकपेक्षा जास्तवेळा भेट दिली.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी २०१८ मध्ये सर्वात कमी परदेश दौरे केले आहेत. २०१४-१५ मध्ये त्यांनी १३, २०१५-१६ मध्ये २४ आणि २०१६-१७ मध्ये १९ परदेश दौरे केले. गेल्या महिन्यातील चीन भेट हा त्यांचा शेवटचा परदेश दौरा होता. या परदेश दौऱ्यांमुळे भारताला परस्पर सामंजस्य आणि राजनैतिक स्तरावर मोठा फायदा झाल्याचा दावा व्ही.के. सिंह यांनी केला.
मात्र, राजकीयदृष्ट्या मोदींचे परदेश दौरे नेहमीच वादाचा विषय राहिले. काँग्रेससह विरोधकांनी मोदींच्या सततच्या परदेश दौऱ्यांवर बरीच टीकाही केली. या दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चावर अनेकांनी शंका उपस्थित केल्या. मात्र, पंतप्रधान मोदी आणि भाजपकडून यावर कायम मौन बाळगण्यात आले.