तमिळनाडू : अभिनेते आणि 'मक्कल नीधि मय्यम' पार्टीचे प्रमुख कमल हसन यांनी आपल्या पक्षाची प्रगती होत आहे त्यामुळे काही लोक मुद्दाम माझ्यावर तसेच माझ्या पक्षावर निशाणा साधत असल्याचं रविवारी तिरुनेलवेली येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले.
कमल हसन यांचा पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांचे खंडण करत कमल हसन यांनी 'माझा पक्ष इतर कोणत्याही पक्षाची बी टीम नाही. माझा पक्ष तमिळनाडुची ए टीम असल्याचे' त्यांनी सांगितले आहे. कमल हसन यांचा पक्ष मक्कल निधि मय्यम आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये तमिळनाडूतील सर्व ३९ जागांवर स्वतंत्र निवडणूक लढणार आहे. लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत त्यांनी 'आम्ही लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही कोणत्याही पक्षाशी युती न करता आपची स्वच्छ प्रतिमा कायम राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे' त्यांनी सांगितले आहे.
कमल हसन यांच्यानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनीही राजकारणात येण्याची घोषणा केली. परंतु त्यांनी आगामी कोणताही निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. रजनीकांत यांनी कमल हसन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'मक्कल निधि मय्यमने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने दुसऱ्या वर्षात प्रवेश केला आहे. कमल हसन माझे प्रिय मित्र असून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो' असे ट्विट करत रजनीकांत यांनी कमल हसन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.