सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाला सोडावे लागले महाकुंभ, आता बहिणींनी सांगितले कारण

Maha Kumbh Mela 2025 : महाकुंभ मेळाव्यातील मोनालिसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोडावे लागले महाकुंभ 

दिक्षा पाटील | Updated: Jan 18, 2025, 05:39 PM IST
सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाला सोडावे लागले महाकुंभ, आता बहिणींनी सांगितले कारण title=
(Photo Credit : Social Media)

Maha Kumbh Mela 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 144 वर्षांनंतर आलेल्या भव्य महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वांत मोठ्या आणि आदरणीय धार्मिक मेळ्यापैकी एक असणाऱ्या या मेळ्यात सरस्वती, यमुना व गंगा या तीन नद्यांच्या पवित्र संगमावर लाखो भक्त जमले आहेत. आतापर्यंत 2 शाही स्नान झाले असून पुढील शाही स्नान 29 जानेवारी 2025 ला मौनी अमावस्येला होणार आहे. या मेळ्यातील अनेक व्हिडीओ, फोटो रोज सोशल मीडियावर येत आहेत. अनेक लोक यामुळे व्हायरल झाले आहेत. अशीच एक इंदूरमधील मोनालिसा नावाची 16 वर्षीय तरुणीही महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आली आहे. या माळा विकणाऱ्या मुलीच्या सौंदर्याची सगळीकडेच चर्चा आहे. त्यामुळे तिच्यावर अनेक रिल्स बनवले जात आहेत. या रीलवरही यूजर्स प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

स्तुती की छळ? 

काजळ घातलेले सुंदर डोळे आणि डस्की त्वचा असलेल्या मुलीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. तिचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, परंतु हा व्हिडीओ चुकीच्या कारणास्तव व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की त्या मुलीचे सौंदर्य टिपण्यासाठी इन्स्टाग्राम रील्ससाठी कॅप्चर करण्यासाठी पुरुष युट्युबर कॅमेरासह रांगेत उभे आहेत. ती पुढे जाते तरी फोन आणि कॅमेरे घेऊन उभे असलेले तरुण तिच्या मागे जात आहेत. यामुळे नेटकरी ही तिची स्तुती आहे की हा तिचा छळ आहे? असा प्रश्न करत आहेत. 

मोनालिसाच्या बहिणींनी सांगितलं तिने महाकुंभ सोडण्याचे कारण

मोनालिसाच्या दोन बहिणी अजूनही महाकुंभच्या ठिकाणी माळ विकत आहेत. 'एबीपी न्यूज' या चॅनेलशी बोलताना दोन्ही बहिणींनी सांगितले की, 'आम्ही इंदूरजवळील महेश्वर येथून प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी आलो आहोत.' मोनालिसाची बहीण विद्याने सांगितले की, 'लोक मागे-मागे धावायचे, त्यामुळे ती माळही विकू शकत नव्हती. त्यानंतर मोनालिसा वडिलांकडे गेली आणि लोक सतत तिच्या मागे येत आहेत, म्हणून रडायला लागली आहे.'

वडिलांनी मोनालिसाला परत घरी पाठवले

मोनालिसाच्या डोळ्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे तिचे वडील प्रचंड नाराज झाले आणि तिला परत घरी पाठवले. सौंदर्याचे कौतुक करण्यात गैर काय? असा प्रश्न मोनालिसाच्या बहिणाला विचारला असता तिने सांगितले की, 'त्यात काहीही चुकीचे नाही, पण ती इथे माळ विकण्यासाठी आली होती. तर लोकांनी तिला त्या माळा विकू दिल्या नाही आणि गुपचूप ती जाईल तिथे तिचे व्हिडिओ बनवू लागले, म्हणून ती परत आपल्या घरी गेली आहे.