महाकुंभसंदर्भात श्री श्री रविशंकर यांचे मोठं विधान, 'फक्त डुबकी मारुन...'

Mahakumbh: श्री श्री रविशंकर यांना महाकुंभाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Feb 19, 2025, 04:03 PM IST
महाकुंभसंदर्भात श्री श्री रविशंकर यांचे मोठं विधान, 'फक्त डुबकी मारुन...'
महाकुंभ स्नान

Mahakumbh: प्रयागराज येथे 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळा सुरु असणार आहे. महाकुंभमेळ्यातील अमृतस्नानासाठी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या पोहोचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. यानंतर रेल्वे मार्गावरदेखील याचा ताण आलाय. दरम्यान विमान प्रवासाने महाकुंभला जाणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. महाकुंभसंदर्भात अध्यात्मित गुरु श्री श्री रविशंकर यांनी मोठे विधान केले आहे. 

'केवळ महाकुंभात डुबकी मारल्याने मोक्ष मिळत नाही' 

श्री श्री रविशंकर यांना हरियाणातील जिंद येथे आयोजित एका कार्यक्रमात स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले. यावेळी श्री श्री रविशंकर यांना महाकुंभाबद्दल विचारण्यात आले. 'केवळ महाकुंभात डुबकी मारल्याने मोक्ष मिळत नाही. खऱ्या अर्थाने, ज्ञानाद्वारे मोक्ष मिळतो', असे ते म्हणाले.  ज्ञानी पुरुष, महात्मा आणि ऋषी संगमावर स्नान करण्यासाठी आले आहेत. जर तुम्ही तिथे जाऊन त्याचे ऐकले तर तुम्हाला नक्कीच मोक्ष मिळेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.

'महाकुंभाच्या व्यवस्थेचे कौतुक'

'जर तुम्हाला वाटत असेल की फक्त स्नान केल्याने तुम्हाला मोक्ष मिळेल, तर हा तुमचा गैरसमज असल्याचे रविशंकर म्हणाले. भाजप महाकुंभाला एक कार्यक्रम म्हणून सादर करत असल्याच्या  आरोप विरोधकांकडून केला जातो. या आरोपांवर श्री श्री रविशंकर यांनी विधान केलंय. 'जेव्हा जेव्हा असा कार्यक्रम आयोजित केला जातो तेव्हा लोक त्याबद्दल प्रश्न उपस्थित करतात, असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी महाकुंभाच्या व्यवस्थेचे कौतुक केले. महाकुंभ येथे व्यवस्था खूप चांगली आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, असे त्यांनी सांगितले. 

 'चेंगराचेंगरी होणे हे खूप दुःखद'

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी संदर्भात श्री श्री रविशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, 'असे होऊ नये. ही खूप दुःखद घटना आहे. देशात कुठेही अशी चेंगराचेंगरी होणे हे खूप दुःखद आहे. अशा घटनांबद्दल जाणून घेणे खूप वेदनादायक आहे',असे त्यांनी यावेळी सांगितले. 

 'तरुणांनी ड्रग्जपासून दूर राहा'

श्री श्री रविशंकर यांनी या कार्यक्रमात शिष्यांना संदेश दिला. 'आपापल्या गावांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पसरवावा आणि व्यसनाच्या या दलदलीत अडकलेल्या तरुणांना वाचवा. तरुणांनी ड्रग्जपासून दूर राहावे. ते त्यांच्यामध्ये खूप वेगाने पसरत आहे, ज्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय होत असल्याचे' ते म्हणाले.