Difference Between Opinion Poll and Exit Poll: 7 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2023 दरम्यान मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभेसाठी मतदान पार पडलं. तर तेलंगणमध्ये 30 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सर्व राज्यांचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. आज संध्याकाळी तेलंगणमधील मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांकडून आणि सर्वेक्षण संस्थांकडून एक्झिट पोल जारी केले जातील. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार बनणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? या प्रश्नांची ठोस उत्तरं आज लगेच मिळणार नसली तरी अंदाज मात्र नक्कीच एक्झिट पोलच्या माध्यमातून मिळतात. आता एक्झिट पोलमध्ये काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. प्रत्यक्ष मतमोजणीआधीच कोणाचं सरकार येणार कोणाचं नाही हे कसं कळतं? याचा इतिहास काय आहे? एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये नेमका फरक काय असतो? या प्रश्नांची उत्तरं पाहूयात...
एक्झिट पोलमध्ये एक पद्धतीचं निवडणूक सर्वेक्षणच असतं. मतदानाच्या दिवशी जेव्हा मतदार मत देऊन मतदान केंद्राबाहेर येतात तेव्हा तिथे वेगवेगळ्या सर्वेक्षण संस्थांबरोबर वृत्त वाहिन्यांचे लोक उपस्थित असतात. ते मतदारांना मतदानासंदर्भात प्रश्न विचारतात. यामध्ये त्यांना तुम्ही कोणाला मतं दिलं? कोणाचं सरकार येऊ शकतं? मतदानाचा कौल कसा असेल? असे प्रश्न विचारले जातात. अशाप्रकारे विधानसभेच्या वेगवेगळ्या मतदार केंद्रावर मतदारांना प्रश्न विचारले जातात. मतदान संपेपर्यंत फार मोठ्या प्रमाणात उत्तरांची आकडेवारी जमा होते. हे आकडे एकत्र करुन अहवाल मांडला जातो. ज्यामध्ये कोणाचं सरकार येऊ शकतं? कोण जिंकू शकतं याचा अंदाज बांधला जातो. लोकांचा मतप्रवाह काय आहे? याचा अंदाज आकडेमोडीच्या आधारे लावला जातो. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा अंदाज व्यक्त केला जातो. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही आकडेवारी एक्झिट पोल म्हणून सादर केली जाते.
वरिष्ठ पत्रकार प्रमोद श्रीवास्तव यांनी एक्झिट पोलसाठी सर्वेक्षण संस्थेचे कर्मचारी किंवा वृत्तवाहिनीचे कर्मचारी अचानक मतदान केंद्रावर जाऊन लोकांशी चर्चा करतात. नेमके कोणाला प्रश्न विचारणार हे आधीपासून ठरलेलं नसतं. सामान्यपणे एका एक्झिट पोलसाठी 30 ते 35 हजारांपासून ते 1 लाखांपर्यंत मतदारांचा कौल जाणून घेतला जातो. वेगवेगळ्या स्तरातील मतदारांकडून मतं जाणून घेण्याचा प्रयत्न असतो.
ओपिनियन पोल हा मतदानाच्या आधी करतात. ओपिनियन पोलमध्ये सर्वांनाच सहभागी करुन घेतलं जातं. यामध्ये मत मांडणारी व्यक्ती मतदार असो किंवा नसो तिचं मत ग्राह्य धरलं जातं. या उलट एक्झिट पोलमध्ये मत देऊन आलेल्यांनाच प्रश्न विचारले जातात. ओपिनियन पोलमध्ये मतदारसंघातील वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल लोकांची काय मतं आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांची चर्चा करुन लोकं कशाबद्दल समाधानी आहेत? कशामुळे नाराज आहेत याचा अंदाज बांधला जातो.
जगात निवडणूक सर्वेक्षणाची सुरुवात अमेरिकेमध्ये झाली.
जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी अमेरिकन सरकारच्या कामासंदर्भात लोकांची मतं जाणून घेतली होती.
त्यानंतर ब्रिटनमध्ये 1937 साली तर फ्रान्समध्ये 1938 साली मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आलं.
त्यानंतर जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम आणि आयर्लंडमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं.
एक्झिट पोलची सुरुवात नेदरलॅण्डमधील सामाजिक विषयांवरील तज्ज्ञ आणि माजी नेते मार्सेल वॉन डॅम यांनी केली.
पहिल्यांदा 15 फेब्रुवारी 1967 रोजी मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलचा वापर केला.
भारतामध्ये एक्झिट पोलची सुरुवात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन (आयआयपीयू) या संस्थेचे प्रमुख एरिक डी कोस्टा यांनी केली.
1996 साली एक्झिट पोल सर्वाधिक चर्चेत आले. त्यावेळेस दूरदर्शनने सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने देशभरात एक्झिट पोल करण्याची परवानगी दिलेली.
1998 साली पहिल्यांदा भारतात एक्झिट पोलचं प्रसारण करण्यात आलं.
- सीएसडीएस
- टुडे चाणक्य
- एबीपी-सी वोटर
- न्यूजएक्स-नेता
- रिपब्लिक-जन की बात
- न्यूज18-आईपीएसओएस
- इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया
- टाइम्स नाउ-सीएनएक्स
- सीएसडीएस