...म्हणून प्रियंकांनी बांधलेली 'राखी' तुटेपर्यंत राहुल गांधींच्या मनगटावरच असते!

बहिण प्रियंका गांधी - वाड्रा यांच्याविषयी आपलं प्रेम व्यक्त करताना राहुल गांधी म्हणतात...

Updated: Apr 5, 2019, 01:58 PM IST
...म्हणून प्रियंकांनी बांधलेली 'राखी' तुटेपर्यंत राहुल गांधींच्या मनगटावरच असते!  title=

पुणे : लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी जनतेच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी अभिनेता सुबोध भावे आणि आर जे मलिष्का मंचावर उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांना शिक्षण-रोजगारापासून ते नियोजन आयोगापर्यंत अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले... यावेळी त्यांना त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलही काही प्रश्न विचारण्यात आले... यातीलच एक प्रश्न होता राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याविषयी... या प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधींनी आपल्या लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला.

आपल्या बहिणीविषयी आपलं प्रेम व्यक्त करताना, 'मी स्वत:च एक नियम बनवलाय... माझ्या हातातली राखी तुटून पडेपर्यंत ती मनगटावरचं असते... मी राखी कधीच काढत नाही. आत्ताही माझ्या हातात राखी आहे आणि ही राखी पुढच्या रक्षाबंधनापर्यंत तशीच राहील... माझी बहीण माझी खूप चांगली मैत्रीण आहे. असंच काहीसं तिनं काल (सोशल मीडियावर) लिहिलंय... आम्ही आमचं आयुष्य एकत्र जगलोय, त्यामुळेच आमचं नातं आणखीनच घट्ट बनलंय' असं त्यांनी म्हटलं. 

यावेळी, एका विद्यार्थीनीनं 'प्रियंका गांधीसोबत तुमचं बहिण-भावाचं भांडण होतं का?' असा प्रश्न राहुल गांधींना विचारला... या प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधी थोडे हळवेही झाले... 'भांडण तर होत नाही... ते अगोदर व्हायचे... ती माझ्यासोबत खूप मस्करी करते... गोडधोड खाऊ घालून ती मला जाडजूड बनवायचा प्रयत्न करते... मी लहान असल्यापासून अनेक हिंसक घटना पाहिल्यात... माझ्या आजीची हत्या झाली... माझ्या वडिलांची हत्या झाली आणि आयुष्याच्या या संपूर्ण प्रवासात माझी बहिणच माझी सर्वात चांगली मैत्रीण राहिली... त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांना खूप चांगलं समजू शकतो... आमच्यात कधीच भांडणं होत नाहीत कारण एकतर ती माघार घेते किंवा मी...' असं म्हणत राहुल गांधी यांनी प्रियंका आणि आपल्या नात्यातले पदर उलगडले. 

दुसरीकडे, गुरुवारी राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आपल्या भावाविषयी सोशल मीडियावर विश्वास व्यक्त करत  'माझा भाऊ, माझा खरा मित्र आहे. आणि तो एक शूर व्यक्ती आहे. वायनाडच्या जनतेने त्याच्यावर लक्ष ठेवावं. तो तुम्हाला निराश करणार नाही' असं म्हणत जनतेला साद घातली होती.