पाटना : बिहारमधील भागलपूर येथील रॅलीत लालू प्रसाद यादव यांनी भिविष्यातील मुख्यमंत्री अशी तेजस्वी यादव यांची ओळख करून दिली खरी. पण, लालूंचे हे वाक्य केवळ मनोरंजनच ठरण्याची शक्यता आहे. याची चुणूक तेजस्वी यादव यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या उत्तरावरून पहायला मिळाली.
आयकर विभागाने २९ ऑगस्टला जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची चौकशी केली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी दरम्यान यादव यांना अनेक प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना तेजस्वी यादव यांनी केवळ तीन ते चार वाक्यात उत्तर दिले. जे ऐकून आयकर विभागाचे अधिकारीही हैराण झाले. अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना तेजस्वी यादव म्हणाले, 'मी तेजस्वी यादव. मी ९ पास आहे.'
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेजस्वी यादव यांना एकूण ३६ प्रश्न विचारले. त्यापैकी बहुतांशी प्रश्नांची उत्तरे तेजस्वी यादव यांनी टाळली. तर काही प्रश्नांना 'आता आपल्याला काही आठवत नाही', असे सांगत बगल दिली. दरम्यान, हे प्रकरण तेजस्वी यादव यांच्या भविष्यातील राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरू शकते, अशी चर्चा बिहारच्या राजकारणात रंगली आहे.